
Sugar Production : देशातील साखर उद्योग यंदा आर्थिक संकटात सापडणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. देशाच्या साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात यंदा घट झाली आहे. जवळपास 60 लाख मेट्रिक टन घट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातल्या साखरेला 24 ते 25 हजार कोटींचा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातल्या बदलत्या हवामानामुळे ऊस शेतीला बसलेल्या फटक्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या काही वर्षांपासून साखर उद्योगाला वेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे, यंदा हवामान बदलाचा फटका हा ऊस शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे.अवकाळी पाऊस, कमी थंडी आणि उन्हाची तीव्रता यामुळे ऊसाच्या क्षेत्रात त्याचबरोबर उताऱ्यात मोठी घट पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम देशातल्या साखर उत्पादनावर झाला आहे. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशाला मागे टाकत महाराष्ट्राने साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकावले होते. मात्र यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील हेक्टरी ऊसाचं उत्पादन घटलं आहे.
नक्की वाचा - MHADA House Prices : सर्वसामान्यांसाठी Good News; म्हाडाची घरं स्वस्त होणार
राज्यातील साखर उत्पादन
- गत हंगामात महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 110.20 लाख मेट्रिक टन इतके झाले होते.
- यंदाच्या वर्षी राज्यातल्या 200 साखर कारखान्यांनी 15 एप्रिल पूर्वी 848.95 लाख मेट्रिक टन उसाचे गळाप केलंय
- यंदा 80.65 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
- मात्र गत वर्षाच्या तुलनेत 34 लाख मेट्रिक टनाची घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदाच्या साखर हंगामावर हवामान बदलाच्या परिणामामुळे 12000 कोटी रुपयाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. चांगल्या जमिनीमध्ये 80 टन पेक्षा जास्त एकरी उत्पन्न होत असताना आणि मध्यम जमिनीत सात टनापेक्षा उत्पन्न जास्त होत असत. पण हवामान बदलाचा फटका ऊस उत्पादनावर थेट झाल्याने एकरी जवळपास सर्वच ठिकाणी 20 टनाचा फटका ऊस उत्पादकांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्याला हवामान बदलाचा फटका बसला असल्याने मदतीचा हात देण्याची मागणी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे. अवकाळी गारपीट, प्रचंड उष्णता यामुळे यंदा गळीत हंगामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. शेतकरी हवामान बदलाच्या फटक्यामुळे ऊस शेतीपासून लांब जात असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात नेहमीच साखर उत्पादन, ऊस उत्पादनात अव्वल नंबरवर असणारे महाराष्ट्र राज्य यंदा हवामानाच्या फटक्यामुळे पिछाडीवर गेला आहे. याचा फटका उत्पादनावर झाला असून हजारो कोटींचा तोटा होण्याची चिंता स्वाभिमानी शेतकरीचे नेते खराडे यांनी व्यक्त केली आहे. यामुळे अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार, केंद्र सरकारकडून मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world