Petrol Shortage Rumors: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या (Iran Israel War Impact) पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार किंवा इंधनाचे दर गगनाला भिडणार, अशा अफवांनी मराठवाड्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. पेट्रोल संपणार किंवा महागणार अशा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्याने 3 मार्चच्या संध्याकाळपासून नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी अवघ्या काही तासांतच साठा संपल्याने 'नो स्टॉक'चे फलकही लावण्यात आले आहेत.
नांदेडमध्ये पोलिसांची धाव, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन | Nanded Petrol Shortage Rumors News
नांदेड शहरात इन्स्टाग्राम पोस्टद्वारे पेट्रोल (Fuel Shortage Rumors) संपणार असल्याची चुकीची माहिती पसरली होती. परिणामी स्थानिकांनी पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी स्वतः पेट्रोल पंपांवर जाऊन नागरिकांना शांत केले. "पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि विनाकारण गर्दी करू नका," असे आवाहन पोलिसांना करावे लागले.
(नक्की वाचा: Mumbai to Dubai :समोरून येत होते क्षेपणास्त्र! मुंबई-दुबई विमानाचा हवेतच थरारक यु-टर्न; पाहा काय घडलं?)
परभणीत तासाभरात पेट्रोल संपले | Parbhani Petrol Shortage Rumors News
परभणीत तर या अफवेचा परिणाम अत्यंत तीव्र पाहायला मिळाला. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्याच्या बातम्यांमुळे पेट्रोल महागणार या भीतीने वाहनधारकांनी पंपांवर गर्दी केली. काही नागरिक तर बाटल्या आणि कॅन घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पोहोचले. या प्रचंड मागणीमुळे अवघ्या तासाभरात शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवरील साठा संपला आणि तिथे 'आऊट ऑफ स्टॉक'चे बोर्ड लावण्यात आले.
(नक्की वाचा: 'ना पाणी, ना जेवण... मी मॉस्को विमानतळावर भिकाऱ्यासारखा उभा आहे!'; मुंबईकर तरुणाची मदतीसाठी आर्त हाक)
हिंगोलीत मध्यरात्रीपर्यंत रांगा | Hingoli Petrol Shortage Rumors Newsहिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातही 3 मार्चच्या रात्री असाच प्रकार घडला. युद्धाच्या भीतीपोटी इंधन साठा संपणार या अफवेने नागरिक धास्तावले. रात्री उशीरापर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा पंपाबाहेर दिसत होत्या. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इंधनाचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
अफवांवर विश्वास ठेवू नका | Chhatrapati Sambhajinagar Petrol Shortage Rumors Newsइंधन दरवाढीच्या अफवेचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरात उमटले आहेत. 'युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणार अशा अफवांनी शहरात वेग घेतल्याने मंगळवारी (3 मार्च) रात्री उशीरापर्यंत पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रविवार आणि धूलिवंदनामुळे काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्याने पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अफवा अधिक प्रमाणात पसरली. पण सध्या युद्धाचे कोणतेही परिणाम पेट्रोलबाबत जाणवत नसून, मुबलक साठा उपलब्ध असल्याने लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world