प्रतिनिधी, आनंद शर्मा
सध्या राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत आहे. विदर्भात काही भागात नागरिकांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागत असला तरी इतर जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. दरम्यान घराघरांमध्ये एसी आणि कुलरचा वापर वाढला आहे. मात्र उष्णतेच्या झळ्यांपासून दिलासा देणारा कुलर आपल्याच घरातील लेकीचा जीव घेईल असा विचारही कुणी केला नसेल. जळगावातील किनोद तालुक्यात अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुलरच्या अपघातात अक्षदा किशोर मोरे या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ती किनोद गावात आई आणि बहिणीसोबत राहत होती. अक्षदाच्या वडिलांचं एका वर्षांपूर्वी कर्करोगामुळे निधन झालं होतं. आई मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतेय. आज शुक्रवारी 12 एप्रिल रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारात घरात उन्हाच्या झळांनी अस्वस्थ झालेल्या अक्षदाने पत्र्याचा कुलर सुरू करण्यासाठी विजेचं बटण दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा जोरात लांब फेकली गेली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच शेजारच्यांच्या मदतीने तिला जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे तपासादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
अक्षदाच्या आईसाठी हा मोठा धक्का आहे. एक वर्षापूर्वी पतीने साथ सोडली आणि आता मुलीच्या अपघाती निधनामुळे अक्षदाच्या आईला जबर धक्का बसला आहे. दरम्यान पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र विजेचा धक्का कसा लागला, कुलरमध्ये काही बिघाड झाला होता का, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world