
मंगेश जोशी, जळगाव: भूत म्हटलं की प्रत्येकाची भितीने गाळण उडते. भूत असते की नसते याबाबत अनेक वाद-विवाद, श्रद्धा अंधश्रद्धा असल्या तरी भूताला सगळेच घाबरतात. असाच काहीसा प्रकार जळगावमध्ये पाहायला मिळाला आहे. जळगावमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयामध्ये भूत असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे भुताच्या भितीने कार्यकर्त्यांनीही कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे. गुलाबराव पाटलांनीच भाषणातून कार्यालयात भुताची अफवा पसरवल्याची माहिती दिली आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावमध्ये चर्चा रंगली आहे ती म्हणजे शिंदेंच्या शिवसेना कार्यालयात भूत असल्याची. नव्यानेच उभारल्या जात असलेल्या या कार्यालयात भूत असल्याच्या चर्चेमुळे हे कार्यालय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव शहरात प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय हे उभारले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यालयाचे काम सुरू असून कार्यालयाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. मात्र या कार्यालयात भूत असल्याची भीती ही कार्यकर्त्यांमध्ये असल्याने या नव्या कार्यालयाकडे या भितीपोटी कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे.
मात्र मध्यवर्ती कार्यालयात भुताची चर्चा असल्याचे भाषणादरम्यान गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही केवळ अफवा असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात हे मध्यवर्ती कार्यालय उभारले जात असून या कार्यालयात भूत असल्याच्या अफवेमुळे चर्चेला उधाण आले आहे.
नक्की वाचा - Shirdi News : भारत-पाकिस्तान युद्धाच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक, साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world