मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे अन्सार पिंजारी यांच्या हत्येनंतर आता पोलीस दलात मोठे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणात कर्तव्यात कसुरी आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
कुणावर झाली निलंबनाची कारवाई?
बोदवड येथील अन्सार पिंजारी हत्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चौकशीअंती निलंबनाचे आदेश काढले आहेत. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके या तिघांचा समावेश आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या प्राचार्याला बेड्या! 'नीट' च्या परीक्षेत असा झाला पेपरचा सौदा )
हलगर्जीपणाचा नेमका ठपका काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अन्सार पिंजारी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीच्या संशयावरून पिंजारी यांनी काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता. मात्र, संशयितांविरुद्ध वेळीच प्रतिबंधक कारवाई करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. चोरीच्या प्रकरणानंतर परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता असतानाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
( नक्की वाचा : SIR: घराघरात पोहोचणार यंत्रणा! मतदार यादी शुद्धीकरणासाठी आयोगाची 'स्पेशल' मोहीम नेमकी आहे तरी काय? )
चोरीच्या संशयातून झाली होती हत्या
अन्सार पिंजारी यांनी चोरीच्या प्रकरणात काही संशयितांवर शंका व्यक्त केली होती. याच कारणावरून चिडलेल्या संशयितांनी पिंजारी यांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर बोदवड परिसरात संतापाची लाट उसळली होती. जर पोलिसांनी वेळेत प्रतिबंधक पावले उचलली असती, तर ही हत्या टळली असती, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. याच गंभीर बाबीची दखल घेत प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world