
मंगेश जोशी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक व जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने काही तरुणांकडून चालकास शिवीगाळ झाल्याची माहिती समोर येत असून शिवसेनेचे कार्यकर्ते धावून गेल्याने दोन गट आमने सामने आले.
दोन गटात झालेल्या वादातून एका गटाकडून पाळधी गावात गडफेक व जाळपोळ करण्यात आली, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाळधी गावात दाखल झाले असून दगडफेक व जाळपोळ करणाऱ्यांनी पळ काढल्याने पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच रात्री उशिरापर्यंत दगडफेक व जाळपोळ करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक व जाळपोळीची घटना घडली असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक हे धावून गेले.
त्यामुळे दोन गट आमने सामने आले आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच दगडफेक व जाळपोळ करणारे संशयित हे पसार झाले असून रात्री उशिरापर्यंत संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world