लक्ष्मण सोळुंके, जालना
Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांचा अपघात हा तांत्रिक बिघाड नसून त्यांची हत्या करण्याचा भाजपचा कट असल्याचा खळबळजनक आणि खोटा दावा करणाऱ्या जालन्यातील एका तरुणाला मुंबई सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील बुटेगाव येथील उद्धव भगवान कापसे हा तरुण 'UK न्यूज टाईम' नावाचे यूट्यूब चॅनल चालवतो. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर उद्धवने एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने दावा केला होता की, विमानाची सर्व सिस्टीम सुरळीत होती, मात्र कुणीतरी विमानाची 'नेव्हिगेशन सिस्टीम' हँग करून ती कंट्रोल करत होते. हा अपघात नसून अजित पवार यांना संपवण्यासाठी भाजपचा हा एक 'गेम' (कट) आहे.
(नक्की वाचा- Oil India: इंधन संकटादरम्यान राजस्थानातून गुड न्यूज! वाळवंटातून निघालं 'काळं सोनं)
कायदेशीर कारवाई आणि कलमे
या प्रक्षोभक आणि पुराव्याविना केलेल्या दाव्यामुळे भाजपच्या आयटी सेलने मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी कडक कारवाई केली आहे: मुंबई सायबर पोलिसांनी बदनापूर तालुक्यातील बुटेगावातून आरोपीला अटक केली. आरोपीवर BNS 319, 336(2), 336(2), 340(2), 352(2) आणि आयटी ॲक्टच्या कलम 66(डी) नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपीला 10 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
(नक्की वाचा- Iran-US War: पायलटला वाचवण्यासाठी महाभारतातील रणनीती आली कामी; शत्रूच्या घरात घुसून अमेरिकेचा 'माईंड गेम')
सायबर पोलिसांचा इशारा
यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा संवेदनशील विषयांवर अफवा पसरवणे आरोपीला चांगलेच महागात पडले आहे. विमानाची नेव्हिगेशन सिस्टीम हँग करण्यासारखी तांत्रिक माहिती त्याला नेमकी कोठून मिळाली, याची सायबर पोलीस आता कसून चौकशी करत आहेत. "विनाकारण अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही," असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world