
राहुल कांबळे
सरकारी कार्यालयांमध्ये आजही भ्रष्टाचाराचा विळखा किती घट्ट आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि यशस्वी कारवाई करत सिडको, नवी मुंबई येथील सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील चार जणांना 3.50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सामान्य नागरिकांना आजही त्यांची कामे करून घेण्यासाठी लाच मागितली जात आहे, कितीही आवाहने-कारवाया केल्यातरी भ्रष्टाचाऱ्यांची हिम्मत कमी होत नाही हे नवी मुंबईतील या घटनेवरून दिसून आले आहे.
कोण आहे हा लाचखोर अधिकारी ?
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल रंगराव कांबळे (50), ऑफिस असिस्टंट; धनाजी दत्तात्रय काळुखे (52), सहकार अधिकारी; महेश गंगाराम कामोठकर, शिपाई आणि किशोर शंकरराव मोरे, या खासगी इसमाचा समावेश आहे. यातील तिघे आरोपी सरकारी कर्मचारी आहेत, तर एक खासगी व्यक्ती आहे. हा खासगी इसम दलाल म्हणून काम करत होता आणि सरकारी कामांसाठी पैशांची देवाणघेवाण करत होता.
काय आहे प्रकरण ?
ही कारवाई एका 54 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरून करण्यात आली. तक्रारदार वाशी सेक्टर-9 येथील नूर को-ऑप. हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी आहेत. त्यांच्या सोसायटीशी संबंधित दोन प्रकरणे उपनिबंधक, सहकारी संस्था, सिडको कार्यालयात प्रलंबित होती. ही प्रकरणे तक्रारदाराच्या बाजूने निकाली काढण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती. वाटाघाटीनंतर हा आकडा 3.50 लाखांवर निश्चित झाला. एसीबीने सापळा रचून 10 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ही कारवाई केली. ठरल्यानुसार, शिपाई महेश कामोठकर याने तक्रारदाराकडून 3.50 लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला जागीच पकडले. यानंतर या प्रकरणातील इतर आरोपींनाही अटक करण्यात आली.
नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7, 7 (अ) आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या लाचखोरांना जरब बसेल, अशी अपेक्षा आहे. सामान्य नागरिकांनी अशा प्रकरणांमध्ये न घाबरता पुढे यावे आणि एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world