जाहिरात

Kalyan News : 'घरात कसं शिराल, चोरी कशी कराल; बापाकडून मुलांना चोरीचं प्रशिक्षण, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याणमध्ये चोरीच्या एका धक्कादायक प्रकरणाचा महात्मा फुले पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Kalyan News : 'घरात कसं शिराल, चोरी कशी कराल; बापाकडून मुलांना चोरीचं प्रशिक्षण, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Kalyan News : कल्याणमध्ये चोरीच्या एका धक्कादायक प्रकरणाचा महात्मा फुले पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात वडिलच आपल्या मुलांना चोरीचे धडे देत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात बंद घरात चोरी झाल्यानंतर महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला. डीसीपी अतुल झेंडे, एसीपी अशोक होनमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके आणि त्यांच्या पथकाने तपास करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला. पोलीस तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कल्याणमधील संतापजनक प्रकार...

या प्रकरणात कैलास भालेराव या 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कैलास याचे वडील विलास भालेराव आणि दुसऱ्या एका अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील दीपक जाधव यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. विलास भालेराव आणि दीपक जाधव हे दोघे आरोपी कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात साफसफाई आणि बिगारीचं कामं करत होते. फिरताना ते बंद घराती रेकी करायचे. त्यानंतर आपल्या मुलांना त्या घरात चोरी करण्यासाठी पाठवत होते. या टोळीत आणखी एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. 

नक्की वाचा - Monsoon in Andaman 2026 : अखेर तो आला! मान्सून अंदमानात दाखल; कोकण किनारपट्टीवर कधीपर्यंत धडकणार? 

वडिलांकडून मुलांना चोरीचं प्रशिक्षण

पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलाविरुद्ध तब्बल 12 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चोरीनंतर मुलं चोरलेल्या पैशातून मौजमस्ती करायचे, तर दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू आरोपी वडिलांकडे जमा केल्या जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. विलास भालेराव आणि दीपक जाधव हे मुलांना चोरी कशी करायची, घरात प्रवेश कसा करायचा आणि चोरीचा माल कुठे लपवायचा याचे प्रशिक्षण देत असल्याचंही समोर आलं आहे. या टोळीने आणखी किती ठिकाणी चोरी केली, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. वडील मुलांना संस्कार आणि शिक्षण द्यायच्या प्रयत्न करतात, मात्र कल्याणमध्ये हे वडील आपल्या मुलांना चोरी कशी करायची याचे प्रशिक्षण देत असल्याची अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com