
राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांच्या प्रचारसभांमधून बडे नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असतानाच गावगाड्यांमध्येही राजकारण रंगत आहे. अशातच कर्जत तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोदिवले येथे एक संतापनजक प्रकार घडला आहे. आज पहाटे काही समाजकंटकांनी .केशव लक्ष्मण तरे, श्री.नाना लक्ष्मण तरे आणि श्री.संतोष लक्ष्मण तरे यांच्या सामाहिक भात शेतीतून पिकविलेल्या भात धान्याचे भारे पेटवून दिले. या प्रकाराची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व माल जळून खाक झाला होता. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा सध्या पंचक्रोशित सुरु आहे.
वर्षातून एकदा भाताचे उत्पन्न घेऊन हे शेतकरी वर्षभर आपला उदरनिर्वाह करत असतात. आधीच महागाई, नैसर्गिक आपत्ती आणि अस्मानी संकटांनी बळीराजा हैराण झालेला असतानाच अशाप्रकारे अन्नाला पायदळी तुडवून राखरांगोळी करण्याचा अतिशय निंदनीय आणि विकृत प्रकार तालुक्यात घडला आहे. या शेतक-यांनी काबाडकष्ट करून पिकविलेला तोंडाशी आलेला घास असा काही नराधमांनी हीन कृत्य करत नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. . त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांमार्फत सखोल चौकशी होऊन ज्या कोणी हा प्रकार केला आहे तो जनतेसमोर येणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
या घटनेबाबत बोलताना अँड.पंकज भगवान तरे यांनी सांगितले की, मागे काही महिन्यांपुर्वी आमच्या शेतावरील बोअरवेल मधील मोटार काढुन चोरून नेली व त्याचबरोबर बोअरवे मध्ये दगड टाकून त्याचेही नुकसान करण्यात आले होते. आता तर वर्षभराच्या आमच्या अन्नधान्याची नासधूस करून त्याची राख रांगोळी करण्यात आली आहे. हा पुर्ण प्रकार राजकीय वैमानस्यातून केला असल्याची दाट शक्यता आम्हाला वाटते तसेच अशा प्रकारच्या घटना घडवून अन्नाची नासधूस म्हणजे एकप्रकारे माता लक्ष्मीची विटबंनाच आहे. आम्ही पोलिस प्रशासनाला विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर गुन्हेगारांना सर्वांसमोर आणावे अन्यथा आज आमचे नुकसान झाले आहे उद्या परिसरातील इतरांचेही नुकसान करतील. म्हणून अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचून आळा घालणे आवश्यक आहे.
ट्रेंडिग बातमी: 'महाराष्ट्राला काँग्रेसचं ATM करु नका,' पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world