विशाल पुजारी
कोल्हापूर शहरात एका बिबट्यानं भरवस्तीत एन्ट्री घेतली. बिबट्याच्या एन्ट्रीन जिल्ह्यात खळबळ उडाली. सकाळच्या सुमारास शिरलेल्या या बिबट्याला पकडण्यात दोन तासाहून अधिकचा काळ लागला. या सगळ्या बचावकार्यत चौघेजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बिबट्या कोल्हापुरात आल्याची माहिती समजल्यानंतर शहरात खळबळ उडाली. नागळा पार्क याठिकाणी असलेल्या एका हॉटेलच्या लॉनमध्ये हा बिबट्या आला. या लॉन परिसरात काम करणाऱ्या बागकाम करणाऱ्या व्यक्तीवर त्याने हल्ला केला. त्यानंतर एका भिंतीवरून उडी मारून महावितरण विभागाच्या परिसरात आला. या परिसरात त्याने एका चेंबरमध्ये उडी मारली. या चेंबरमध्ये अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी बचावपथक कार्यरत होतं. या बचावकार्यासाठी वनविभागाचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि पोलीस उपस्थित होते. तब्बल तीन तासाहून अधिकचा काळ बचावकार्यासाठी लागला.
बिबट्या कसा आला?
कोल्हापूर शहरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. आज पहाटे हा बिबट्या सासणे ग्राउंड परिसरात फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. सकाळी अकरा वाजता हा बिबट्या नागळा परिसरातल्या एका हॉटेलमध्ये शिरला. त्यानंतर त्याने बागकाम करणाऱ्या एकावर हल्ला करून बाजूलाच असलेल्या महावितरण विभागाच्या कार्यालय आवारात प्रवेश केला. त्याने परिसरातील एका चेंबरमध्ये आसरा घेतला. त्यानंतर या बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरु झाली.
बिबट्या पकडण्यासाठी मोहीम
वन्यजीव बचाव पथक कोल्हापूर, अग्निशमन दल, पोलीस कर्मचारी या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी तैनात होते. एक ड्रोन देखील या मोहिमेसाठी कार्यरत ठेवण्यात आला होता. रेस्क्यू जॅकेट घालून दोन तरुण बिबट्या घुसलेल्या चेंबरजवळ गेले. त्यांच्यासोबत इतरही अधिकारी, कर्मचारी होते. घटनास्थळी वाईल्ड लाईफ ऍनिमल व्हॅन ठेवण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी जाळी लावून सुरक्षित करण्यात आले होते. बिबट्याला चेंबरमधून बाहेर काढल्यानंतर एका लोखंडी जाळीत घालून व्हॅनपर्यंत नेण्यात आलं.
त्यानंतर व्हॅनमध्ये घालून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. हे रेस्क्यू करण्यासाठी विनायक माळी, अमोल चव्हाण, आशुतोष सूर्यवंशी, ओंकार काटकर, प्रदीप सुतार, मतीन बांगी, छत्रपती वाइल्ड लाईफ फौंडेशन आणि सह्याद्री शिलेदार ट्रस्टचे देवेंद्र भोसले, विनायक आळवेकर सहकारी असे तरुण आणि बचावपथक कार्यरत होते. यापूर्वी रुईकर कॉलनी याठिकाणी एकदा बिबट्या आलेला. तेव्हाही प्रशासनाची भाबेरी उडालेली. भरवस्तीत बिबट्या शिरण्याची ही दुसरी वेळ होती. सध्याच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नागरिक भीतीच्या वातावरणात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world