नवी मुंबईतील उलवे येथे 1,160 हेक्टर जागेवर देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ विकसित होत आहे. अदाणी समूह (74%) आणि सिडको (26%) यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पावर 19,650 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नवी मुंबई विमातनळ कार्यान्वीत झाल्यानंतर मुंबईतल्या विमातळात काही बदल होणार आहे. त्याबाबत आता पासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई विमानतळाचा ही चेहरामोहरा बदलणार आहे.
अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अरुण बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई विमानतळाचे टर्मिनल 2 पूर्ण झाल्यानंतर, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (CSMIA) टर्मिनल 1 (सांताक्रूझ) नव्याने बांधण्यात येणार आहे. 2029 मध्ये हे केले जाईल असं सांगितलं जात आहे. यामुळे मुंबई हे आता लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोसारख्या जागतिक शहरांच्या यादीत सामील होईल, जिथे एकापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा देणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर 2025 पर्यंत व्यावसायिक कामकाजासाठी खुले होईल. असे सांगण्यात आले आहे. मुंबईतील सांताक्रूझ आणि अंधेरी येथील दोन विमानतळांवर विमानांचा वाढलेला भार कमी करून, हवाई सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. डिसेंबरपासून इथे प्रत्यक्षात हवाई वाहतूक सुरू होईल. काही महिन्यापूर्वी या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे उद्घाटन केले होते. हे विमानतळ विकासासाठी गेमचेंजर ठरणार आहे.
एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर यांसारख्या प्रमुख विमान कंपन्या या नवीन विमानतळावरून सेवा सुरू करणार आहेत. येथून दिल्ली, बंगळूरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध होईल. इंडिगो कंपनीने दररोज 36 देशांतर्गत उड्डाणे आणि 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबईतून सुरू करण्याची योजना आखली आहे. तर अकासा एअर दररोज 40 विमानसेवा, त्यापैकी 8 ते 10 आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करेल. नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 4B आणि आमरा मार्ग हे मुख्य रस्ते आहेत, तसेच नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील तरघर रेल्वे स्थानक देखील जवळ आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world