Maharashtra Cabinet Decisions: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जनतेच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये कोकण रेल्वेचे शिल्पकार स्व. मधू दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्यासह डोंबिवलीतील देवस्थान आणि नागपुरातील पायाभूत विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील 4 प्रमुख
सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण
कोकण रेल्वेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ नेते आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार स्व. मधू दंडवते यांचे नाव आता सावंतवाडी रेल्वे स्थानकाला दिले जाणार आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव आता ‘लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस' असे करण्यास राज्य मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली आहे. कोकणातील जनतेची ही अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर राज्य सरकारने मार्गी लावली असून, या नामकरणाबाबतचा अंतिम प्रस्ताव आता मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
(नक्की वाचा- Pune Jamavbandi: पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवस जमावबंदी लागू! महापालिकेकडून गाईडलाईन्सही जारी)
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ
राज्य शासनाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्ष 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 'महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005' या कायद्यातील आवश्यक त्या सुधारणेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराला मिळणार 4 एकर जमीन
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा ता. कल्याण, जि. ठाणे येथील प्रसिद्ध पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला हक्काची जमीन देण्याचा मोठा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार, मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन मिळणार आहे. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा सद्यस्थितीतील वापर नियमित करण्यात येणार असून, ही मोक्याची जमीन ट्रस्टला अत्यंत नाममात्र दरात देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
नवीन नागपूर रस्ता प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्क माफ
नागपूर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी महसूल विभागाने आर्थिक सवलत जाहीर केली आहे. मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन 'नवीन नागपूर' व 'नवीन बाह्य वळण रस्ता' प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी केली जाणार आहे. या थेट जमीन खरेदीच्या व्यवहारावर आकारले जाणारे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि नोंदणी शुल्क (Registration Fee) पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world