विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होवू शकते. त्यानंतर आचारसंहीता लागू होईल. त्या आधी महायुती सरकारने उद्घाटनाचा धडाका लावला आहे. आजचही मुख्यमंत्री अनेक ठिकाणी विकास कामांची उद्घाटने करणार आहे. नवी मुंबई विमानतळावर आज वायू दलाचं पहिलं विमान उतरणार आहे. शिवाय महाराष्ट्र भवनाच्या भूमी पूजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाह एकूण दहा ठिकाणी मुख्यमंत्री भूमीपूजन करणार आहेत.
तमिळनाडूमध्ये एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाडी एकमेकांना धडकल्याने मोठा अपघात
तमिळनाडूमध्ये रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाडी एकमेकांना धडकल्याने हा अपघाता झाला आहे. म्हैसूरहून दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस तमिळनाडूतील कावरपेट्टई स्टेशनजवळ मालगाडीला धडकली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
शिवसेना आमदार भरत गोगावलेंविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
शिवसेना ठाकरे गटाच्या महाड महिला शहर प्रमुख तृप्ती पाटील यांनी दाखल केला तक्रार अर्ज.
शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात केली मोठी गर्दी.
गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा.
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानात 144 प्रवासी
केरळमधील त्रिचीहून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड. विमानाला विमानतळावर उतरवण्यात अडचण येत आहे. विमान हवेत घिरट्या घालत आहे. विमानात 144 प्रवासी असल्याची माहिती. विमानाच्या हायड्रोलिक सिस्टममध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे विमान विमानतळावर उतरू शकत नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावर 20 हून अधिक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे.
#WATCH | Tamil Nadu: Air India flight from Trichy to Sharjah faced a technical problem (Hydraulic failure) and is rounding in air space to decrease the fuel before landing at Trichy airport. More than 20 Ambulances and fire tenders are placed at the airport to make sure no big… pic.twitter.com/rEiF6mSZz2
— ANI (@ANI) October 11, 2024
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका : ॲड. प्रकाश आंबेडकर
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केले आहे.
अजित पवारांची संध्याकाळी महत्वाची पत्रकार परिषद, मोठ्या घोषणेची शक्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार संध्याकाळी महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या बरोबर प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे ही उपस्थित असणार आहेत. यावेळी ते मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतल्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट
गुरूवारी झालेल्या पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. उद्या देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उद्या पाऊस झाल्यास आझाद मैदानातील शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा असेल किंवा ठाकरेंचा शिवाजी पार्कचा मेळावा असेल, या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे दसरा मेळाव्यावर सध्या पावसाचे सावट आहे.
पुण्यात पुन्हा हिट अॅण्ड रन, एकाचा मृत्यू
पुण्यात पुन्हा एकदा हिट अॅण्ड रन झाले आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. कारचालक दारुच्या नशेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर रात्री 1 वाजता हा अपघात घडला आहे. अपघात झाल्यावर चालक पळून गेला. या अपघातात रौफ अकबर शेख हा मृत्यूमुखी पडला आहे.
काल कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही - अजित पवार
अजित पवार काल झालेल्या कॅबिनेटमधून लवकर निघाले होते. त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कॅबिनेट नंतर नियोजित कार्यक्रम लातूर येथे होता. त्यासाठी नांदेड विमानतळ येथे जायचे होते, कॅबिनेट 11 वाजता होती. नियोजित वेळे पेक्षा ती उशिरा सुरू झाली. महत्वाच्या विषयांची चर्चा कॅबिनेट मध्ये झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीसांना सागून निघाल्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे.
पुण्यातील बाल न्याय मंडळातले 2 अधिकारी बडतर्फ
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर बाल न्याय मंडळ चर्चेत आलं होतं. याच न्याय मंडळातील दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. राज्य महिला आणि बाल विकास आयुक्त प्रशांत ननावरे यांनी ही माहिती दिली आहे. पदाचा गैर वापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्या दोन अधिकाऱ्यांची पोर्श कार अपघात प्रकरणात 300 शब्दांचा निबंध लिहिण्यावरून आणि 17 वर्षीय मुलाला जामीन मिळण्यावरून चौकशी करण्यात आली होती.
अमरावती जिल्ह्यात शरद पवारांना मोठा धक्का
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष पदावरून प्रदीप राऊत यांना हटवल्याने पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. पाच महिन्यातच जिल्हाध्यक्ष पदावरून काढल्याने राऊत समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई विमानतळावर आज पहिलं विमान उतरणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे वायूदलाचे विमान आज उतरणार आहे. हे नवी मुंबई विमानतळावर उतरणारं पहिलं विमान असेल. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे उपस्थित असतील. शिवाय सिडको व नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळेही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. यात महाराष्ट्र भवनाच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रमा पार पडणार आहे.