
अमजद खान
शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे शहर प्रमुख सुजल म्हात्रे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ही घटना डोंबिवलीत घडली. या घटनेनंतर म्हात्रे यांनी तातडीने विष्णूनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखली केली आहे. म्हात्रे यांच्यावर हा हल्ला दुसरा तिसरा कुणी नाही तर त्यांच्याच चुलत भावाने केल्याचे समोर आले आहे. पैशाच्या देवाण-घेवाणीतून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे.
म्हात्रे यांचे त्यांच्या सख्ख्या चुलत भावासोबत वाद सुरु होता. त्यांच्या चुलत भावाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यानेच हा हल्ला केल्याचा आरोप सुजल म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र सुजल म्हात्रे यांनी त्याच्या नातेवाईकांपासून त्याच्या जिवितीला धोका असल्याची भिती व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने पोलीस कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण पोलिसांनी या प्रकरणात जरी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीना नोटिस देऊन घरी पाठविण्यात आले आहे.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
डोंबिवलीतील मोठा गावात सुजल म्हात्रे हे राहातात. त्यांच्यावर युवा सेनाच्या शहर प्रमुखपदाची जबाबदारी आहे. सुजल म्हात्रे बुधवारी रात्री देवीच्या पाडा परिसरात काही कामानिमित्त आले होते. घरी जात असताना त्यांच्या कार समोर काही लोक आले. त्यांची कार अडवली गेली. त्यांना गाडीच्या बाहेर ये असे सांगितले. त्यांच्यासोबत वाद घातला गेला. त्यांच्या गाडीची तोडफोड केली गेली. शिवाय त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सुजल म्हात्रे यांच्या सोबत वाद घालून तोडफोड करणारे चुलत भाऊ रोहन म्हात्रे, रुचित म्हात्रे, रोमेश म्हात्रे यांच्या विरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परंतू या गंभीर प्रकरणात आरोपींना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. मात्र सुजल म्हात्रे यांनी सांगितले की, त्यांना मारहाण करणाऱ्यां विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसानी ठोस कारवाई केली पाहिजे. त्यांच्यापासून माझ्या जिविताला धोका आहे, असं त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world