राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातील दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फूट एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याचे राजकीय चित्र बदलून गेले आहे. कधीकाळी एकत्र असलेले नेतेच या विधानसभेत एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. त्यामुळे आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी हायहोल्टेज लढती पाहायला मिळतील, ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कोणत्या आहेत अशा चुरशीच्या, अटीतटीच्या आणि लक्षवेधी लढती? वाचा सविस्तर...
बारामतीत दादांचीच दादागिरी की युगेंद्रचा उदय?
लोकसभा निवडणुकीत ज्या संघर्षाची सर्वाधिक चर्चा झाली ती बारामतीमधील पवार विरुद्ध पवार लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. लोकसभेला नणंद- विरुद्ध भावजय असा सामना रंगल्यानंतर आता विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या आमने- सामने येणार आहेत. बारामती विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांनी तुतारी फुंकली आहे. शरद पवार यांनी बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देत अजित पवार यांच्याविरुद्ध मोठे आव्हान उभे केले आहे. बारामती विधानसभेवर अजित पवार यांचे वर्चस्व असले तरी लोकसभेत सुप्रिया सुळेंना मिळालेले लीड, युगेंद्र पवार यांना मिळणारा पाठिंबा आणि महत्वाचं म्हणजे स्वतः शरद पवार यांनी मैदानात उतरुन टाकलेले डावपेच यामुळे बारामतीची लढाई दादांसाठी नक्कीच सोपी नसेल. त्यामुळे बारामती मतदार संघात दादांची दादागिरी कायम चालणार की युगेंद्र पवारांच्या राजकारणाचा उदय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
'राज'पुत्र अमित ठाकरे मैदान मारणार?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आणखी एक महत्वाची आणि राज्याचे लक्ष लागलेली लक्षवेधी लढत म्हणजे माहिम विधानसभा मतदार संघ. माहिममधून यंदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. 2019 च्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंना वरळीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी पुतण्याला मदत केली होती. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळेच या निवडणुकीत उद्धव ठाकरेही अमित ठाकरेंविरोधात उमेदवार न देता मदतीची परतफेड करतील, असे बोलले जात होते, मात्र ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे लोकसभेतबिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता मनसेविरोधात शिंदे गट किंवा भाजपही उमेदवार देणार नाही, अशी शक्यता होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली, या उमेदवारीला भाजपकडून विरोध झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना माघार घेण्याचीही विनंती केली, मात्र मोठ्या राजकीय घडामोडीनंतरही सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे माहिम विधानसभेमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरल्याने या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
वरळी विधानसभा: आदित्य ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई; मनसे, शिंदे गटाचे आव्हान
विधानसभेच्या रणधुमाळीमधील आणखी एक महत्वाची, राज्याचे लक्ष लागलेली महत्वाची लढत म्हणजे वरळी विधानसभा. वरळी विधानसभेत विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाने तगडे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मात्र मनसेने पक्षाचे सरचिटणीस, राज ठाकरेंचे विश्वासू संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाने मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवले आहे. एकीकडे काकांनी दिलेले आव्हान आणि दुसरीकडे शिवसेनेतील बंडानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे असा सुरु झालेला संघर्ष पाहता ही निवडणूक म्हणजे आदित्य ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. आदित्य ठाकरेंना पाडण्यासाठी महायुतीने लावलेली ताकद आणि संदीप देशपांडे यांचे तगडे आव्हान पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळे वरळीमध्ये आदित्य ठाकरे आपले वर्चस्व कायम राहणार की मनसे, शिंदे गट बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ऐनवेळी सतेज पाटलांची कोंडी, कोल्हापूर उत्तरमध्ये कोण बाजी मारणार
विधानसभेचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. विधानसभेचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनीटे शिल्लक असतानाच काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेल्या मधुरिमा राजे यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मधुरिमा राजेंच्या या भूमिकेने सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला. त्यामुळेच नेहमी शांत, संयमी भूमिकेत असणारे सतेज पाटील पहिल्यांदाच संतापल्याचे पाहायला मिळाले. आता काँग्रेसने कोल्हापूरमध्ये अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा दिला आहे. महत्वाचं म्हणजे कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर यांनाच काँग्रेसने अधिकृत तिकीट दिले होते. मात्र लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध झाल्यानंतर त्यांचे तिकीट रद्द करत मधुरिमा राजेंना देण्यात आले. अशातच आता मधुरिमा राजेंनी सर्वांना धक्का देत उमेदवारी मागे घेतल्याने सतेज पाटलांसाठी ही लढाई महत्वाची झाली आहे. त्यामुळे या लढतीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदगाव विधानसभा: सुहास कांदेंविरुद्ध समीर भुजबळ
महायुतीमध्येच बंडाचा झेंडा फडकलेली महत्वाची लढत म्हणजे नांदगाव विधानसभा. नांदगाव विधानसभेत महायुती पुरस्कृत शिंदे गटाचे सुहास कांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ यांनी दंड ठोपटले आहेत. त्यामुळे आता नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदें विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार असून मंत्री छगन भुजबळ यांनी थेट महायुतीलाच आव्हान दिल्याने ही लढत रंगतदार होणार आहे. भुजबळांच्या या आव्हानामुळे नांदगावमध्ये कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.