महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य ढवळून काढण्याच्या हेतूने भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे शीर्षस्थ केंद्रीय नेते प्रचाराच्या अंतिम 10 दिवसात महाराष्ट्रात असणार आहेत. भाजपच्या स्टार प्रचारक यादीतील सर्व शीर्षस्थ नेते मंडळी 8 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. कार्यक्रमाचे दिवस आणि स्थान निश्चिती जवळपास झालेली असल्याचे कळते आहे.
नक्की वाचा - Assembly Election : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काटोल मतदारसंघात सभा होणार असल्याचे संकेत आहेत. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. स्वतः अमित शाह काटोल येथे सभा घेऊन काही खळबळजनक बॉम्बशेल टाकतील, अशी महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ सूत्रांना अपेक्षा आहे. काटोल येथून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांच्या ऐवजी त्यांचा मोठा मुलगा सलील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत. अनिल देशमुख यांनी "द डायरी ऑफ ए होम मिनिस्टर" या पुस्तकाद्वारे भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांवर विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या पार्श्वभूमीवर स्वतः केंद्रीय गृहमंत्री यांचे काटोल येथे भाषण झाले तर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असताना झालेल्या घटनांवर नक्कीच ते त्यांच्या शैलीत भाष्य करतील आणि ते भाजपकडून कडवट उत्तर असेल असे संकेत आहेत. काटोलची भाजपची ही सभा विधानसभा निवडणुकीत परिणामकारक असेल, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खात्री वाटत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world