
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिशा सालियन प्रकरणावरु सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. यावरुनच भाजप नेत्या चित्रा वाघ आणि ठाकरेंचे आमदार अनिल परब यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. 'तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते' म्हणत चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यावर विरोधकांनीही जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी टीकाकारांना खडेबोल सुनावले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
"महिलांचा आवाज दाबायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला.. महिलांना हलक्यात घेऊ नका हा मेसेज द्यायचा होता. या सटर, फटर वटवाघळांची लायकीच तेवढी आहे. ती कुठल्याही परिस्थितीतून घाणेरडे काहीतरी काढायचे आणि त्यावर बोलायचे. अरे आम्हालाही घरदार आहे ना. आम्हालाही संसार आहे. आम्ही काय रस्त्यावर पडलोय का? तुम्ही आमचे बोलता आम्ही तुमचे बोललो तर? मग तुमच्यात आणि आमच्यात काही फरक नाही राहिला', असे चित्रा वाघ म्हणाल्या.
"मला पुन्हा सांगायचं आहे, ज्याची तेवढी लायकी तेवढाच विचार करतो. काल माझे नाव घेऊन बोलले, म्हणून मी बोलले. ज्यापद्धतीने अनिल परबांनी चित्रा वाघ असे बोट दाखवून बोलले त्यामुळे मला उत्तर द्यावे लागले. महिलांना हलक्यात घेऊ नका, जे मी बोलले त्याचा मला अभिमान आहे. हाच मेसेज मी त्यांना दिला आहे. तुम्ही आमच्या कॅरेक्टरवर बोलणार, कारण तुमच्याकडे बोलायला काही नाही. एवढा प्रगाडपंडित हुशार त्याला उत्तर देता आले नाही. ही नीच प्रवृत्ती आहे. म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच उत्तर देणार... अशा शब्दात त्यांनी विरोधकांना ठणकावले.
यावेळी त्यांनी सुषमा अंधारेंच्या टिकेचाही चांगलाच समाचार घेतला. "दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनीच मला निरोप पाठवला होता की चित्राताई एकदा भेटा. त्यामुळेच त्यांच्या शब्दाला मान देऊन मी मातोश्रीवर गेले. माझी खूप इच्छा होती की बाळासाहेबांच्या खुर्चीचे दर्शन घ्यायचे होते, मी तिथे जाऊन पाया पडले. यावेळी आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते," असा खुलासा करत चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केला.
दरम्यान, "मला कोण काय बोलते याचा फरक पडत नाही. सभागृहाची गरीमा काय फक्त महिलांनीच जपायची का? संजय राऊत- रोहिणी खडसेंनी याबाबत शिकवू नये. आज जे सुपात आहेत ते जात्यात येणार आहेत. माझा २६ वर्षाचा संघर्ष आहे. माझ्या पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी मी सभागृहात आले आहे. माझा ऊसूल आहे, हम किसी को छेडते नही हैं, मगर हमे किसी को छेडा तो छोडते नही हे.. आज ठेचलंय पुन्हा नादाला लागाल तर पुन्हा ठेचणार.." असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world