
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूरमध्ये होत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 40 नेते आज मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा दादा भुसे यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. कट्टर शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार ते दुसऱ्यांचा मंत्रिपद मिळवणाऱ्या दादा भुसेंचा राजकीय प्रवासही शून्यातून सुरु झाला आहे. म्हणूनच त्यांना प्रवाहाविरुद्ध राजकारण करणारा नेता म्हणून ओळखले जाते.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 6 मार्च 1964 दादाजी भुसे यांचा जन्म झाला. त्यांनी डीसीएपर्यंतचे शिक्षण घेतले असून दोन मुले आहेत. दादा भुसे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सामान्य होती. त्यांचे वडील शेतकरी होते, त्यामुळे घरात कोणताही राजकीय वारसा नव्हता. त्यात मालेगाव हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अशा परिस्थितीत दादा भुसे यांनी एक सामान्य शिवसैनिक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी गावोगावी शिवसेनेच्या शाखा उभारल्या. त्यामधून त्यांच्यामागे तरुणांचे संघटन उभे राहिले. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण होत असतानाच त्यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली.
मालेगावच्या राजकारणात सहकारमहर्षी भाऊसाहेब हिरे यांचा दबदबा होता. त्यांच्यानंतर त्यांच्या घरातील वारसांनी ही परंपरा कायम राखली. सुरुवातीच्या काळात दादा भुसे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचाही सामना करावा लागला. मात्र 2004 मध्ये त्यांनी हिरे यांच्या साम्राज्याला हादरा देत आमदारकी मिळवली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
(नक्की वाचा- Narhari Zirwal : सरपंच, आमदारकीची हॅटट्रिक आता मंत्री... नरहरी झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द)
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ते ग्रामविकास राज्यमंत्री होते. तर उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. एकनाथ शिंदेच्या बंडातही त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यानंतर त्यांना नाशिकचे पालकमंत्री तसेच राज्यात कृषीमंत्रीपद देण्यात आले. आतामालेगाव बाह्य मतदारसंघातून त्यांनी पाचव्यांदा आमदारकी मिळवली असून पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world