
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी मंदिर समितीच्या 450 एकर जागेत 701 कोटी रुपये निधीतून ‘ज्ञानपीठ' उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विकास आराखडा सर्व मंजुरीसह केंद्राकडे पाठवला असून, या माध्यमातून इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच ह.भ.प. शांतीब्रम्ह मारोती महाराज कुरेकर यांना पद्म पुरस्कार देण्याची शिफारस राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे केली जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्र्यांनी आज ( शनिवार, 10 मे) श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)' कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, देशात ज्या काळात परकीय आक्रमणांचा मारा वाढला होता आणि भागवत धर्म संकटात सापडला होता, त्या कठीण काळात भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वारकरी संप्रदायाने केले. म्हणूनच इतकी आक्रमणे झाल्यानंतरही आपला धर्म, संस्कृती आणि विचार कोणीही संपवू शकले नाहीत. वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर यांनी रचला आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी त्यावर कळस चढवला. वारकरी संप्रदायाने जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे काम केले.
( नक्की वाचा : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार, वाचा कसा होणार राज्याचा फायदा? )
आज महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरण्यामागे वारकरी संप्रदायाने रुजवलेली संस्कृती आणि अध्यात्मिक परंपरा आहे. जग हे मान्य करत आहे की, भौतिक श्रीमंती ही काही काळ टिकते, पण त्यातून शाश्वत सुख, शांती मिळतेच असे नाही. भारताचे मानसिक स्वास्थ्य आजही टिकून आहे कारण येथे संत परंपरेचे वैभव आहे.
प्रत्येक गावात होणारा सप्ताह, भागवत धर्माचा सुविचार आणि काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरणाचे काम केले जाते. भौतिक प्रगती कितीही झाली, तरी अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती शक्य नाही हे सनातन धर्माने हजारो वर्षांपूर्वी ओळखले होते. म्हणूनच नामस्मरणासारख्या परंपरा निर्माण झाल्या. हीच विचारांची श्रीमंती आपल्या देशाला खऱ्या अर्थाने जगातील सर्वात समृद्ध देश बनवते.
जगातील सर्वात मोठी तीर्थयात्रा म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात दिसणारी स्वयंशिस्त. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतून दिलेला विचार वारीच्या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. संत ज्ञानेश्वर यांनी सर्वसामान्य जनतेसाठी भगवद्गीतेचे ज्ञान मराठीतून ‘ज्ञानेश्वरी'च्या माध्यमातून पोहोचवले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मोलाचे योगदान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world