पुणे: विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यात सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार याबाबतचे चित्र येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. अशातच राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली असून भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सर्वात महत्वाचे विधान केले आहे. उद्धव ठाकरे आले तर आमचे स्वागत आहे, असं ते म्हणालेत .
राज्यातील 288 विधानसभा मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतदानानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
'उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत आहे. मात्र तशी वेळ येणार नाही. सरकार बनवण्यासाठी 160 चा आकडा महायुतीकडे असेल. त्यामुळे कुणालाही बरोबर घेण्याची वेळ येणार नाही. मात्र पश्चाताप होऊन जर आमची वाट चुकली, आम्हाला पुन्हा यायचं आहे असं कुणी म्हटलं तर आमचं शीर्ष नेतृत्व मनाने मोठं आहे. त्यामुळे जुनं काही लक्षात न ठेवता त्यांचं स्वागत करु,' असे सर्वात मोठे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
तसेच 'सरकार महायुतीचं येणार हे यांच्याबद्द्ल त्यांच्याही मनात शंका नाही. मात्र महायुतीचं सरकार जरी आलं तर विरोधी पक्षनेता कोण हा देखील भांडणाचा विषय असतो. महाविकास आघाडीला बहुमत मिळणे दूर-दूरवर दिसत नाही. सर्वे रिपोर्टच नाही तर राज्यभरात माहिती देणारी माणसे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणारच नाही', असाही दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
'महायुतीचं सरकार येणार हे फिक्स आहे. महायुतीचे १६० आमदार जिंकून येणारच आहेत. इतर जे कुणी सहाकार्य करतील तो बोनस असेल. त्यामुळे सरकार आम्ही स्थापन करणार हे फिक्स आहे. एकनाथ सिंदे मुख्यमंत्री असले तरी तिघे मिळून सरकार चालवत होते. महायुतीत आमच्यात अडीच वर्षात कधीच विसंवाद नव्हता. स्टेअरिंग कुणाच्या एकाच्या हातात नाही. मात्र मुख्यमंत्री केवळ एकच होतो. आमच शीर्ष नेतृत्त्व कोण मुख्यमंत्री असेल हे ठरवतील. कुणाची हाती स्टेअरिंग आहे तर तिघांच्याही हाती सत्तेचं स्टेअरिंग आहे,' असंही ते म्हणाले.
दरम्यान, ऐन निकालाच्या दिवशीच चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपच्या बड्या नेत्याने जाहीररित्या उद्धव ठाकरेंना साद घातल्याने राज्यात पुन्हा भाजप- सेना युती पाहायला मिळणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत.