महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. निकालाला अद्याप एक दिवस शिल्लक असतानाच राजकीय वर्तुळात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. निकालआधी आलेल्या एक्झिट पोलने महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांची झोप उडवली असून अपक्ष आणि बंडखोरांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी आता जोरदार फिल्डिंग सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा दावा करण्यात आला असून सत्तेच्या चाव्या अपक्ष आणि बंडखोरांच्या हाती असतील असे संकेत दिले आहेत. त्यानंतर आता अपक्षांच्या पळवापळवीसाठी आणि बंडखोरांच्या जुळवाजुळवीसाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु झाले आहेत. महाविकास आघाडीसह महायुतीकडून अपक्ष आणि बंडखोरांना संपर्क साधला जात आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा निर्णय घेतला असून राज्यातील आठ प्रमुख नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
नक्की वाचा: 'पूर्ण मतमोजणी होत नाही तोपर्यंत...' मविआच्या उमेदवारांना ही खास सुचना का?
भाजप महायुतीकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. मंत्री रवींद्र चव्हाण , भाजप नेते प्रवीण दरेकर , संजय कुटे , मोहित कंबोज , नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्याकडे ही जबाबादारी देण्यात आली आहे. भाजपचे हे नेते बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करतील.
राज्यामध्ये एकूण 150 पेक्षा अधिक उमेदवार बंडखोरी करत मैदानात उतरले आहेत. त्यांपैकी 35 हून अधिक उमेदवार विजयी होतील, अशी शक्यता आहे. त्यामुळेच सत्तेची खुर्ची गाठण्यासाठी अपक्ष अन् बंडखोरांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे त्यांचे भावही चांगलेच वाढल्याचं दिसत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही बंडखोरांसह अपक्षांना संपर्क केले जात आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत असल्याने अपक्ष निवडून येणारे आमच्यासोबत राहतील , असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
महत्वाची बातमी: महायुतीला किती जागा? चंद्रकांत पाटील यांनी नेमका आकडा सांगितला