
बुलढाणा: शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शासकीय ज्वारी खरेदीस मोठी मुदतवाढ दिली असून आता 30 सप्टेंबरपर्यंत ही ज्वारी खरेदी करता येणार आहे. शासनाने याबाबतचे परिपत्रकही जारी केले आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या 'च्या लढ्याचे हे यश असल्याचा दावा रविकात तुपकर यांनी केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने शासकीय ज्वारी खरेदीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे 18 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट झाले आहे. हे रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे यश असल्याचा दावा संघटनेने केला आहे. 30 ऑगस्ट रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी मलकापूर येथील उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.
संकटाचे मळभ दूर झाले! गौतम अदाणी यांनी मानले कर्मचाऱ्यांचे आभार
या मोर्च्यात ज्वारी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे व मुदतवाढ द्यावी, यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या, याकडे संघटनेकडून लक्ष वेधण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद व मलकापूर या भागात यंदा ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांनी हमीभावासाठी नोंदणी केली असली तरी मात्र खरेदी केंद्र बंद असल्याने त्यांना ज्वारी कमी दराने खुल्या बाजारात विकावी लागत होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व मोर्चामुळेच प्रशासन व सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे संघटनेच्या वतीने म्हटले जात आहे. "शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणे हेच आमचे ध्येय आहे. शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू ठेवण्यासाठी आम्ही संघर्ष केला आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पुढेही शेतकऱ्यांसाठी लढत राहू, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world