
अमेरिकेच्या हिंडेनबर्ग अहवालामुळे गेल्या 2 वर्षांपासून अदानी समूहावर असलेल्या संशयाचे ढग आता दूर झाले आहेत. भारतीय बाजार नियामक सेबीकडून मिळालेल्या 'क्लीन चिट'मुळे अदाणी समूहाला बट्टा लावण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे. या पार्श्वभूमीवर अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी अदाणी समूहातील कर्मचारी, सहकारी यांचे आभार मानले आहेत. एक संदेश गौतम अदाणी यांच्यातर्फे प्रसारीत करण्यात आला आहे. या संदेशामध्ये अदाणी यांनी म्हटले आहे की, 'गेली 2 वर्षे आपल्यावर असलेले संकट आता संपले आहे.' हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांप्रकरणी सेबीने चौकशी सुरू केली होती. सखोल तपासानंतर, अदाणी समूहावर लावण्यात आलेले सगळे आरोप हे निराधार असल्याचे म्हणत क्लिन चिट देण्यात आली.
नक्की वाचा: GST नंतर सर्वसामान्यांना आणखी एक गुडन्यूज! दिवाळीआधी RBI कडून मिळणार मोठं गिफ्ट?
विशिष्ट हेतूने बदनामीचा प्रयत्न
जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्गने अदानी समूहावर लेखांकनात अनियमितता, शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार आणि गुप्त ऑफशोर कंपन्यांचा वापर केल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती आणि समूहाचे बाजार भांडवल 150 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी झाले होते. अदाणी समूहाने सुरुवातीपासून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे असून हा समूहाची विशिष्ट हेतूंसाठी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. सेबीने या प्रकरणी सखोल चौकशी केली होती, ज्याचा निष्कर्षही अदाणी समूहाने केलेल्या दाव्यांप्रमाणेच निघाला आहे. हिंडेनबर्ग रिसर्च ने केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं सेबीने दिलेल्या क्लिन चिटमुळे स्पष्ट झालं आहे.
नक्की वाचा: ट्रायल झाली पण ठाणे मेट्रो सुरु कधी होणार? MMRDA कडून तारखा जाहीर
प्रकल्प अव्याहतपणे सुरू ठेवणाऱ्या सहकारी, कर्मचाऱ्यांचे मानले आभार
अदाणी समूहावर करण्यात आलेले आरोप हे विशिष्ट हेतूने आपल्याला टार्गेट करण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे गौतम अदाणी यांनी म्हटले आहे. या कठीण समयी समूहाच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आणि कामावर कोणताही विपरीत परिणाम होऊ न देणाऱ्या सगळ्या सहकारी, कर्मचारी यांचे आभार मानण्यासाठी गौतम अदाणी यांनी हा विशेष संदेश प्रसारीत केला आहे. चहूबाजूने आलेल्या दबावानंतरही बंदरे, वीज प्रकल्प, विमानतळ आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांसारखे मोठे प्रकल्प अविरतपणे सुरू राहिले आणि याचे श्रेय कर्मचाऱ्यांना जाते असे अदाणी यांनी म्हटले. आता अदाणी समूह नावीन्यता, पारदर्शकता आणि शाश्वतता यावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे गौतम अदाणी यांनी म्हटले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world