विष्णु बुरगे, लातूर:
Latur Heatstroke Death: राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत असून अनेक जिल्ह्यांमध्ये उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. लातुर जिल्ह्यामध्येही उन्हाचा पारा वाढला असून उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Mumbai Goa Highway: कोकणात जाताय तर आधी टोल भरा! 'या' ठिकाणी पुन्हा टोलधाड सुरु होणार
उन्हाचा तडाखा, शेतकऱ्याचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे उष्माघाताने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात काम करताना ही दुर्दैवी घटना घडली. निलंगा तालुक्यासह औराद शहाजानी परिसरात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
याच रणरणत्या उन्हात दुपारी चारच्या सुमारास भंडारे शेतात काम करत असताना अचानक चक्कर येऊन ते कोसळले. त्यांना तातडीने औराद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र निलंग्याकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून आणि नातू असा परिवार आहे.
जळगावमध्येही उष्माघाताचा बळी?
दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या पाळधी येथील जितेंद्र दगडू पाटील या 38 वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जितेंद्र पाटील हे नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना दुपारच्या कडाक्याच्या उन्हात त्यांना अचानक डोकेदुखी व चक्कर येऊ लागली. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ पाळधी येथील डॉक्टरांकडे नेले.
प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना जळगावला नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून जितेंद्र यांना मृत घोषित केले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सध्या तापमान 42 अंशांच्या घरात पोहोचले असून, उष्माघाताच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world