राहुल तपासे, प्रतिनिधी
Maharashtra IPS Transfer : सातारा जिल्ह्यातील अलीकडील राजकीय घडामोडींनंतर पोलीस प्रशासनात मोठा बदल करत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे शहरातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेने जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेनंतर पोलीस प्रशासनावर, विशेषतः एसपी तुषार दोशी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले गेले. त्यांना निलंबित करण्याची मागणीही जोर धरू लागली होती.
‘सॉफ्ट अॅक्शन' की प्रमोशन
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ निलंबनाचा निर्णय न घेता दोशी यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवले. यानंतर आज त्यांच्या बदलीचे आदेश अचानक जारी करण्यात आले. दरम्यान, या बदलीकडे वेगळ्या नजरेनेही पाहिलं जात आहे. निलंबनाची मागणी होत असतानाच दोशी यांची बदली सांगलीसारख्या तुलनेने मोठ्या आणि संवेदनशील जिल्ह्यात करण्यात आली आहे. त्यामुळे ही बदली म्हणजे एकप्रकारे ‘सॉफ्ट अॅक्शन' की प्रमोशन असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कारवाईची अपेक्षा असताना अधिक मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याने या निर्णयामागील नेमके संकेत काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
निखिल पिंगळे कोण आहेत?
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले एसपी निखील पिंगळे हे पुणे क्राईम ब्रँचमधील अनुभवी अधिकारी असून गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. साताऱ्यातील अलीकडील वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था मजबूत करणे, तसेच पोलिसांवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे, ही त्यांच्यासमोरील मोठी जबाबदारी असणार आहे. या सर्व घडामोडींमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून पुढील काही दिवस या बदलांचे परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world