
Marathwada Heavy Rain Update: राज्यभरात सध्या पावसाचा जोरदार तडाखा बसत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसदृश्य पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेती अक्षरशः खरडून गेली असून, अनेक भागांत नद्या आणि ओढ्यांना पूर आला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, घरांमध्येही पाणी शिरले आहे. लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. (Maharashtra Marathwada Rain News)
चौघांचा मृत्यू, 72 जणावरे दगावली
या अतिवृष्टीमुळे गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यात एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. लातूर आणि नांदेड येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर लातूर जिल्ह्यातील एक व्यक्ती पुरात वाहून गेली. याशिवाय धाराशिव येथेही एका व्यक्तीचा पावसामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जनावरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे एकूण ७२ जनावरे दगावली आहेत. यामध्ये सर्वाधिक २१ जनावरे धाराशिव जिल्ह्यात, तर १६ जनावरे बीड जिल्ह्यात दगावली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ५, जालनामध्ये १२, परभणीत ३, हिंगोलीत ६ आणि नांदेड व लातूरमध्ये प्रत्येकी ३ व ६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
रस्ते पुलांचे नुकसान, गावांचा संपर्क तुटला
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. पुरामुळे ६ रस्ते आणि ५ पुलांचे नुकसान झाले आहे. तसेच ४ तलाव फुटले असून, ७६ कच्ची-पक्की घरे कोसळली आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेचेही नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील (Beed Rain) ७० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या २२८ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके कार्यरत आहेत. जालना येथे अग्निशमन विभाग, बीडमध्ये नगरपरिषद पथक, तर धाराशिवमध्ये महसूल आणि लष्करी पथके (Army) कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यात एनडीआरएफ (NDRF) पथकाची मागणी करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये पुरात अडकलेल्या २७ व्यक्तींना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world