मंगेश जोशी, जळगाव: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरगच्च यश मिळाल्यानंतर मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार व कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचे लक्ष लागलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा असून मुख्यमंत्री ठरण्या अगोदरच एकनाथ शिंदे हे मुंबईवरून आपल्या दरे गावी गेल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क वर्तवली जात आहेत. ही संधी साधत विरोधकांनी देखील महायुतीसह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. यावरुनच शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी आता थेट उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
'ठाकरेंच्या महालाला आमची ही एक वीट असून त्या विटांना ठाकरे विसरले म्हणून संजय राऊत यांच्यासारखे दगड ठाकरे घेऊन आले. त्या दगडाने ठाकरेंच्या महालाचा सत्यानाश केल्याचा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील पाच जागा संजय राऊत हे पाडणार होते. मात्र एकही जागा ते वाचवु शकले नाही त्यामुळे ठाकरेंनी आता तरी संजय राऊत यांना ओळखावं,' असा खोचक सल्ला गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
नक्की वाचा: 'राज्यात संशयाचं संभ्रमाचं वातावरण, दिग्गज कसे हरले?' युगेंद्र पवार असं का म्हणाले?
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंकडे असलेल्या 20 आमदारांपैकी 10 शिवसेना शिंदे गटात येण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावाही गुलाबराव पाटलांनी केला आहे. गुलाबराव पाटलांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरेंच्या गटातील 10 आमदार कोण असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
'महायुतीला तुफानी बहुमत मिळाले असताना सरकार स्थापन करण्याऐवजी एकनाथ शिंदे शेतात जाणे पसंत करतात असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला तर अमावस्या पौर्णिमेला कोणती शेती असते असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनीही एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जे महालात राहतात त्यांना शेत काय कळणार?' असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाची बातमी: वयाच्या 40 व्या वर्षी हरवली, तब्बल 14 वर्षांनी सापडली, 'तिचा' शोध कसा लागला?