
राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असतात. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याला एकनाथ शिंदेंनी दांडी मारली ज्यानंतर या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. यावरुनच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार घणाघात करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे सामना अग्रलेख?
"महाराष्ट्र सरकारकडे बहुमताचा आकडा आहे, पण सरकार स्थिर आहे काय? याबाबत शंका आहे. सरकार स्थिर नाही आणि सरकारचे मानसिक स्वास्थ्यही बरे नाही असे एकंदरीत रोजच्या घडामोडींवरून दिसते. देवेंद्र फडणवीस हे सध्या मुख्यमंत्री आहेत. त्याच वेळी अजित पवार यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे व तसे त्यांनी उघडपणे बोलून दाखवले."
"अजित पवार सहावेळा उपमुख्यमंत्री झाले हा विक्रम आहे, पण इतका तगडा गडी अद्याप मुख्यमंत्री झालेला नाही व भाजपसोबत राहिले तर त्यांच्या मनातली मुख्यमंत्रीपदाची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. अमित शहा सवतीच्या पुतण्याला मुख्यमंत्री का करतील? हा साधा प्रश्न आहे. 'कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते आहे, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही,' अशी कबुली अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा दिली. अजित पवार हे असे बोलले तरी फडणवीस यांना त्यांच्यापासून धोका नाही.
"एकनाथ शिंदे आपण मुख्यमंत्री नाही हे मानायला तयार नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतरही आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांना त्यांच्या 'पक्षप्रमुखां'नी म्हणजे अमित शहांनी सांगितले होते, पण फडणवीस यांनी वाढलेले ताट हिसकावून घेतले. तेव्हापासून हे महाशय दाढीला गाठ बांधून फिरत आहेत. "पुन्हा मुख्यमंत्री होऊनच दाखवतो," अशाच तोऱयात ते फिरत असतात. खरे म्हणजे शिंदे हे स्वतःला 'माजी' म्हणवून घ्यायला तयार नसतील तर त्यांनी स्वतःला सदैव 'भावी मुख्यमंत्री' असे म्हणवून घ्यायला हरकत नाही. एपंदरीत महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारमध्ये गोंधळ आहे., असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तापक्षांमध्ये एक प्रकारचे 'प्रॉक्सी वॉर' चालले आहे. प्रत्येक जण एकमेकाला आजमावीत आहेत. संजय शिरसाट या मंत्र्याने अजित पवारांना 'शकुनी' म्हटले. सामाजिक न्याय खाते बंद करण्याची मागणीच संबंधित मंत्र्याने करावी व अजित पवारांना 'शकुनी' म्हणावे इथपर्यंत राज्याच्या सरकारमधील युद्ध पोहोचले आहे. आता शकुनीमामाने आयोजित केलेल्या गौरव सोहळ्यास जाण्याचे ताज्या ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी टाळले. प्रश्न इतकाच आहे की, अजित पवारांना आज जे 'शकुनी' म्हणतात, ते उद्या फडणवीस यांना दुर्योधन म्हणायला मागेपुढे पाहणार नाहीत. आंबेडकर म्हणतात, 'तो गिळण्या'चा क्षण जवळ येत आहे. कोण कोणाला गिळणार एवढेच पाहायचे.. असेही यामध्ये म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world