
राकेश गुडेकर, रत्नागिरी: महायुतीमध्ये एकीकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन वाद सुरु आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद रंगलेला असतानाच आता महायुतीमधील आणखी दोन मंत्र्यांमध्येच जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
कोकणात महायुतीतल्या दोन मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दापोलीमध्ये हिंदू धर्म सभा घेत हर्णे मधील दगडफेक प्रकरणावरून राज्याचे गृहराज्यमंत्री आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता.. यावरून योगेश कदम यांनीही नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते नितेश राणे?
'दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव FIR मध्ये नाही ही बाब गंभीर. हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार सरकार असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कोण वाचवणारे असतील ते मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाहीत, हे संबंधित या खात्यातील लोकांनी लक्षात घ्यावं,' असं म्हणत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे योगेश कदम थेट इशारा दिला होता.
योगेश कदम यांचे प्रत्यूत्तर...
यावरुनच योगेश कदम यांनीही राणेंवर पलटवार केला आहे. 'नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदार संघात येऊन मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. मतदार संघात शांतता कशी राखावी हे मला चांगलं समजतं. मी जन्मापासून शिवसेनेत आहे, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाच बाळकडू पाजलंय. मी कधीही भगवा खाली ठेवला नाही, याचा अर्थ नितेश राणे यांनी समजून घ्यावा. एका शिवसैनिकाला हिंदुत्व शिकवू नये,' अशा शब्दांत योगेश कदम यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world