यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि कोकणासह घाट परिसरात हाहाकार उडवून देणारा पाऊस आता शांत होण्याची शक्यता आहे. मात्र, याच वेळी राज्यातील इतर भागांतील नागरिकांची चिंता वाढवणारी एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रातील पावसाचे स्वरूप पूर्णपणे बदलणार असून, पावसाचा मुख्य प्रवाह आता दुसऱ्या भागांकडे सरकणार आहे. यामुळे आगामी 2 ते 3 दिवसांत राज्यातील काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा जोर कोकण-पुण्याकडून इतरत्र सरकणार
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि नाशिक परिसरातील जनजीवन गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे पूर्णपणे विस्कळीत झाले होते. वाहतूक व्यवस्थेवरही याचा मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता या भागात सुरू असलेला पावसाचा जोर ओसरणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य भारताच्या दिशेने पुढे सरकत असल्याने पावसाचे हे केंद्र बदलले आहे.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )
या तीन विभागांना मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 48 ते 72 तासांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. या बदलत्या हवामानामुळे मध्य भारत, उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रातील या तीन विभागांमध्ये पावसाचा जोर अचानक वाढणार असल्यामुळे तिथल्या नागरिकांना विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Palghar : हसता हसता रडू आलं! पालघरमधल्या धबधब्यावर अवघ्या 2 मिनिटांत बदललं चित्र, पर्यटकांचा जीव... पाहा VIDEO )
हवामान क्षेत्रातील या मोठ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर, ज्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तिथल्या स्थानिक प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी नागरिकांना हवामान खात्याने जारी केलेल्या अधिकृत इशाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि कोणतीही निष्काळजी न बाळगता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world