
Mumbai Pune Rain IMD Alert: 24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नक्की वाचा: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! शासकीय ज्वारी खरेदीची मुदत वाढली; पाहा नवी डेडलाईन
पावसाने हवामान खात्याला गंडवलं
या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.
पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
नक्की वाचा: GST नंतर सर्वसामान्यांना आणखी एक गुडन्यूज! दिवाळीआधी RBI कडून मिळणार मोठं गिफ्ट?
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठच्या व कमी उंचीच्या भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनास व बचाव पथकांना सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पथके व साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
धाराशिवमध्ये 12 नागरिकांची सुटका
धाराशिव जिल्ह्यात (परांडा तालुक्यातील मौजे लाची) येथे झालेल्या पावसामुळे 12 नागरिक अडकले होते. या नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी नाशिकवरून एअर फोर्सचे हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे येथील एक पथक रवाना करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) धुळे येथील एक पथक पाठवण्यात आले आहे.
मराठवाडा पावसाने बेजार झाला
बीड जिल्ह्यात नदीला आलेल्या पुरामुळे (सिंदफना नदी परिसर) या ठिकाणच्या नागरिकांना मदत व बचाव कार्यासाठी नगरपालिका बीड यांच्याकडील बोट पाठविण्यात आली. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे एक पथक शोध व बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सिना आणि भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) चे एक पथक रवाना व नगरपालिका बार्शी अग्निशमन दलाची बोट घटनास्थळी पाठविण्यात आली आहे. तसेच सीना नदीकाठच्या सर्व नागरिकांना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सचेत ॲप मधून सतर्कतेचा संदेश देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील चार गावे पूरग्रस्त असून हिवरा नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने मदत व बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक पाठवण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आणि जिल्हा स्तरावरील आपत्कालीन कार्य केंद्रांचे संपर्क क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, मंत्रालय, मुंबईसाठी 022-22027990, 022-22794229 आणि 9321587143 हे क्रमांक देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, धाराशिव (02472-227301), अहिल्यानगर (0241-2323844), बीड (02442-299299), सोलापूर (0217-2731012) आणि जळगाव (0257-2217193 / 2223180) या जिल्ह्यांसाठीही संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world