Maharashtra Weather Forecast 2026: राज्यात उन्हाच्या तीव्र झळा आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झालेले असतानाच आता हवामानात एक मोठा आणि अचानक बदल झाला आहे. तुम्ही पुढच्या काही दिवसांत घराबाहेर पडण्याचा किंवा प्रवासाचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हवामान विभागाने राज्यासाठी एक मोठा इशारा जारी केला असून राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला पावसाचा दणका बसणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाचा तब्बल 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आयएमडीने 9 जून 2026 रोजी राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे.
या जिल्ह्यांमध्ये काही भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील, तसेच मध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे.
( नक्की वाचा : Monsoon 2026: मान्सून आला तरी पेरणीची घाई नको! हवामान विभागाने का दिलाय असा सल्ला? जाणून घ्या सविस्तर )
चार दिवस पावसाचा जोर कायम
हा पावसाचा जोर केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, 10 जून ते 13 जून 2026 या कालावधीत मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची मालिका सुरूच राहण्याची शक्यता आहे. याशिवाय सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मान्सूनची सक्रियता वाढल्याने तिथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
नाशिक आणि अहमदनगरमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाळी वातावरण राहील. तर मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांत हलक्या सरी कोसळतील. मात्र, पाऊस पडत असला तरी विदर्भ आणि खान्देशात उष्णतेचा पारा कायम राहणार असून तापमान 40 अंशाच्या वरच राहण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Kharif Crop Planning: अल निनोच्या संकटात शेती वाचवणार 'हा' फॉर्म्युला; यंदाच्या खरिपात 'या' पिकांची करा निवड )
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
राज्यात पाऊस सक्रिय होत असला तरी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जोपर्यंत सर्वत्र समाधानकारक आणि सलग पाऊस पडत नाही, तोपर्यंत खरिपाच्या पेरण्या घाईघाईने करू नयेत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले की, सध्याचे वातावरण मराठवाड्यात मान्सूनच्या गतीला थोडे रोखत आहे. मात्र, 12 जून ते 18 जून दरम्यान हा मान्सून संपूर्ण मराठवाडा व्यापेल असा अंदाज आहे.
विजांच्या कडकडाटात घ्यावयाची काळजी
हवामान विभागाने नागरिकांना विजा चमकत असताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात किंवा खुल्या मैदानात काम करणे त्वरित थांबवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडांखाली किंवा कच्च्या शेडखाली उभे राहणे टाळावे, कारण तिथे वीज पडण्याचा धोका सर्वाधिक असतो.
( नक्की वाचा : Monsoon Prediction निसर्गाची अद्भूत शक्ती! 'या' पक्ष्याच्या अंड्यांवरून ठरतो मान्सूनचा काळ; वाचा काय आहे पद्धत )
घरात असताना विजेची उपकरणे प्लगमधून काढून ठेवावीत आणि पोहणारे किंवा पाण्याच्या भागात असलेल्या लोकांनी तातडीने पाण्याच्या बाहेर यावे, जेणेकरून कोणताही अनर्थ घडणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world