निलेश वाघ, मालेगाव:
Actor Dharmendra News: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते, ही मॅन म्हणून ओळखले जाणारे अभिनयाचे बादशहा धर्मेंद्र यांचे सोमवारी (ता. 24) निधन झाले. धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनयासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. अभिनयासह धर्मेंद्र त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने फक्त सिनेविश्वचं नाही तर मालेगावमधील टोकडे गावावरही शोककळा पसरली आहे. काय आहे या गावाचे धर्मेंद्र यांच्याशी कनेक्शन? वाचा...
धर्मेंद्र यांच्या निधनाने टोकडे गावावर शोककळा!
अभिनेते धर्मेंद्र आणि नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील टोकडे गावाचा ऋणानुबंध आगळाच होता. बहुसंख्य जाट समाज असलेल्या टोकडे गावात धर्मेंद्र यांनी त्यांच्या मातोश्री सतिवती कौर यांच्या नावाने शाळेला इमारत बांधून दिली होती, एवढेच नाही तर धर्मेंद्र स्वतः या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. तीन वेळेस त्यांनी गावाला भेटी दिल्या आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने अख्खा गाव हळहळला तर गावाने धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पानिपतच्या युद्धात पराभव झाल्यानंतर मराठ्यांबरोबर हरियाणातील काही जाट मंडळी महाराष्ट्रात आली. राज्यातील जवळपास २२ गावांमध्ये हा समाज स्थायिक झाला. त्यापैकी मालेगाव तालुक्यातील टोकडे हे एक गाव. जाटांची महाराष्ट्रातील राजधानी म्हणून टोकडे हे गाव ओळखले जाते. समाज बांधवांचे गाव म्हणून अभिनेता धर्मेंद्र यांचा टोकडे गावाशी संबंध आला. उत्तरोत्तर तो अधिक घट्ट होत गेला.
या गावात धर्मेंद्र यांनी त्यांची आई सत्यवती कौर यांच्या नावाने १९८४ मध्ये शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन केले. या भूमिपूजन कार्यक्रमास धर्मेंद्र हे शोले चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्यासह टोकडे गावात आले होते. अभिनेते म्हणून धर्मेंद्र हे तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते. ते गावात आल्याने तसेच शाळा इमारत बांधून देणार असल्याचे समजल्यानंतर गावाला अत्यानंद झाला. त्यादिवशी धर्मेंद्र व सिप्पी यांची बैलगाडीत बसवून गावात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती.
गावात शाळा, धर्मेंद्रजींचा साधेपणा भावला..
गावातील युवक त्यांना भेटण्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमप्रसंगी भेट जरी झाली तरी धर्मेंद्र यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कधीही आढेवेढे घेतले नाही, उलट फोटो काढत गावाची खुशाली विचारत असतं. त्यांच्या पायी चालण्याचा वेग इतका होता होता की त्यांच्यासोबत असलेला पोलिसांचा बंदोबस्त अक्षरशः त्यांच्या मागे पळायचा.
गावातील शाळेच्या सहली धर्मेंद्र यांच्या घरी जायच्या ते पण तेवढ्याच उत्साहात मुलांना आनंदाने भेट देत. अशा जुन्या आठवणींना ग्रामस्थांनी उजाळा दिला. एका युगाचा, पर्वाचा अंत झाला. धर्मेंद्र यांच्या जाण्याने टोकडे गावावर शोककळा पसरली असून गाव शोकसागरात बुडाले आहे...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world