अविनाश पवार,मंचर:
Manchar Nagarpanchayat Election Result 2025: राज्यातील 288 नगरपरिषद तसेच नगरपंचायतींचा निकाल रविवारी जाहीर झाला. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले, ज्याची जोरदार चर्चा झाली. अनेक ठिकाणी अवघ्या एका मताने निवडणुकाचा निकाल फिरला तर काही ठिकाणी चिठ्ठीने कौल दिला. मंचरमध्येही चिठ्ठीद्वारे नगरसेवक निवडण्यात आला. या निकालाचीही सर्वत्र चर्चा होत आहे.
मंचरमध्ये चिठ्ठीने निवडला नगरसेवक...!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पहिल्यांदाच निवडणूक पार पडलेल्या मंचर नगरपंचायतीत दोन उमेदवारांना मतदारांनी समान कौल दिला. मग चिठ्ठी उचलण्याचा निर्णय झाला अन या चिठ्ठीने शिंदे शिवसेनेच्या लक्ष्मण पारधी यांचं नगरसेवक पदाचं दार उघडलं. चिठ्ठीत त्यांचं नाव आल्याचं ऐकून लक्ष्मण यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मंचर येथील नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. या प्रभागात शिंदे शिवसेनेनं लक्ष्मण मारुती पारधी आणि भाजपनं ज्योती संदीप बाणखेले यांना रिंगणात उतरवलं. दोघांनी ही मतदारांकडे मतांचा जोगवा मागितला. पण या मतदार राजाने दोघांना ही समान कौल दिला, दोघांच्या पारड्यात 223 इतकी समान मते टाकली.
लक्ष्मण पारधी यांचा विजय...!
त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिट्ठी टाकण्याचा निर्णय घेतला. दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली, अखेर लक्ष्मण पारधी यांची चिठ्ठी उचलली गेली अन नगरसेवक पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. चिठ्ठीद्वारे नगरसेवक निवडल्यानंतर लक्ष्मण पारधी यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. दुर्दैवाने ज्योती बाणखेले यांना मात्र नशिबाने साथ दिली नाही अन् मतदार राजाने भरभरुन मतपेटीतून दान दिल्यानंतरही त्यांना पराभव स्विकारावा लागला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world