Maharashtra Local Body Election Results 2025 : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपसोबत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानेही चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची मात्र मोठी पिछेहाट झाली आहे. त्यात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. या निकालाचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. जर नगरपालिकांसारखंच चित्र महापालिका निवडणुकांवर दिसलं तर भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो.
नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत भाजपाचा बोलबाला
राज्यातील 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतीचे निकाल हाती आले आहेत.
भाजप - १२०
शिंदेंची शिवसेना - ५७
अजित पवार गट - ३८
ठाकरे गट - १०
काँग्रेस - ३०
शरद पवार गट - १०
इतर - २३
राज्यात पुन्हा एकदा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्या खालोखाल शिवसेना शिंदे गटानं बाजी मारली आहे. एकंदरीतच महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार दणका दिला आहे. या निवडणूक निकालामुळे सत्ताधारी महायुतीची पकडज अधिक मजबूत झाली आहे. या निवडणूक निकालाचा परिणाम आगामी मुंबई महापालिका आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणुकीवर होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे.
2017 च्या निवडणूक निकालांच्या तुलनेत यंदा भाजपला दुप्पट यश मिळालं आहे. गेल्या वेळेस नगरपालिकांमध्ये भाजपचे १६०१ नगरसेवक होते, आता ही संख्या ३३२५ वर गेल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारालाही लवकरच सुरुवात होईल. मात्र, आजच्या निकालामुळे महायुतीचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर महाविकास आघाडीतील घटकपक्षांची चिंता मात्र वाढली आहे. नगर परिषद आणि नगर पालिका निवडणूक निकालातील 7 महत्वाचे मुद्द्यावरुन बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
- नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपला एकतर्फी विजय मिळालाय. राज्यात भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वत:ला सिद्ध केलं
- राज्य सरकारमध्ये महायुती असली तरी अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने होते. तरीही महायुतीचं प्रदर्शन चांगलं राहिलं.
- तुलनेनं महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये एकजूट दिसली नाही. परिणामी मविआला मोठा फटका बसलाय.
- काँग्रेसनं अनेक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली आणि काही ठिकाणी चांगलं प्रदर्शन केलं. त्याचा फायदा काँग्रेसला झाला, पण मविआ मागे पडली.
- महाविकास आघाडीत काँग्रेस मित्रपक्षांपेक्षा चांगली कामगिरी करताना दिसतेय. मविआत काँग्रेसनेच दोन अंकी संख्या गाठली.
- उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे प्रचारात फारसे सक्रीय नव्हते. त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसला.
- शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही.
'टायगर अभी जिंदा है', चंद्रपूर मनपात काँग्रेसचा झेंडा फडकणार
दुसरीकडे चंद्रपुरात काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. चंद्रपुरात 7 नगर परिषदांमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष बसलाय. त्यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 'टायगर अभी जिंदा है' म्हणत भाजपला इशारा दिलाय. इतकंच नाही तर चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच झेंडा फडकेल असा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे. दुसरीकडे भाजपच्या विजयावर खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत निशाणा साधलाय. आकडे तेच, मशीन त्याच, पैसाही तितकाच, अशा शब्दात राऊतांनी भाजपचा विजय हा पैसा आणि ईव्हीएमची कमाल असल्याचं म्हटलंय.
महापालिका निवडणुकीतही निकालाचं हेच चित्र कायम राहणार - रविंद्र चव्हाण
दरम्यान विरोधक टीका करत असले तरी भाजपने आकड्यांचं गणित जिंकलंय आणि महापालिका निवडणुकीत हेच चित्र कायम राहील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. मागच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. शिवसेनेत फूट पडलीय. त्यात शिंदेंची शिवसेना भाजपसोबत आहे. दुसरीकडे मुंबईत तरी महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडलीय. त्यामुळे भाजपचा विजयाचा वारु रोखणं विरोधकांना नक्कीच सोपं राहिलेलं नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
