सूरज कसबे, प्रतिनिधी
Vadgaon Nagarpanchayat Election 2025 Result : लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला किती अनन्यसाधारण महत्त्व असते,याचा प्रत्यय वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निकालातून आला आहे. येथील प्रभाग क्रमांक 2 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे यांनी भाजपच्या पूजा आतिष ढोरे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या चुरशीच्या लढतीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं होतं.
नेमकी आकडेवारी काय ?
निकालाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता ढोरे यांना 323 मते मिळाली,तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या पूजा ढोरे यांच्या पारड्यात 322 मतं पडली. त्यामुळे पुजा ढोरे यांचा एका मताच्या फरकाने पराभव झाला. केवळ एका मताच्या फरकाने विजय निश्चित झाल्याने मतमोजणी केंद्रावर शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक कायम होती.सुनीता ढोरे यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
नक्की वाचा >> Election 2025 : राज्यातील 288 नगरपालिकांमध्ये कोण जिंकलं? वाचा सर्व विजयी नगराध्यक्षांची नावे एका क्लिकवर
आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान,नगराध्यक्ष पदाच्या महत्त्वाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) च्या उमेदवार अबोली ढोरे यांनी विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 17 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गज रिंगणात होते.परंतु, सुनीता ढोरे यांचा एका मताचा विजय हा या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे.
नक्की वाचा >> Akluj Election : "घायल हू इसलिये..", BJP चा मोठा पराभव, कोणी जिंकल्या 26 पैकी 22 जागा? अकलूजचा 'धुरंधर' कोण?
मतदारांच्या एका मताची ताकद
सामान्य कुटुंबातून आलेल्या सुनीता ढोरे यांच्या विजयानंतर "माझे एक मत काय करणार ?" असे म्हणणाऱ्या मतदारांना चपराक बसली आहे. "माझ्या एका मतालाही मोठी किंमत आहे," हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विजयानंतर बोलताना सुनीता ढोरे यांनी मतदारांचे आभार मानले असून, प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world