
Mumbai Police News: मुंबई शहरात सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा बांधवही मुंबईमध्ये धडकलेत. गणेशोत्सव तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा अबाधित राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळेच मुंबईमधील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई शहरात गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी आणि मंडळांच्या परिसरात गर्दी वाढत आहे. त्याच वेळी मराठा आंदोलनामुळेही विविध ठिकाणी आंदोलक एकत्र येत आहेत. या दोन्ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी असणे अनिवार्य आहे. त्यामुळेच, सद्यस्थितीची गरज ओळखून सर्व रजा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे निवेदन?
सदर ज्ञापनाव्दारे आपणांस असे आदेशित करण्यात येते की, गणेशोत्सव सणाचे निमित्ताने तसेच मराठा आरक्षण मागणीचे अनुषंगाने मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेले मराठा बांधव यामुळे कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याचे दृष्टीने वरिष्ठांकडून तसेच पोलीस नियंत्रण कक्षाकडून वारंवार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देणेबाबत आदेशित होत आहे. सदर मनुष्यबळाची पूर्तता करणे क्रमप्राप्त असून त्याकरिता या आस्थापनेवरील रूग्णनिवेदन / गैरहजर / अर्जित रजा/ किरकोळ रजेवर असलेले पोलिस अंमलदार यांना तात्काळ कर्तव्यावर हजर होणेबाबत सूचित करून त्यांना कर्तव्यावर उपस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
यास्तव, आपण कंपनी लेखनिक / सहलेखनिक म्हणून आपले कंपनीतील रूग्णनिवेदन / गैरहजर / अर्जित रजा / किरकोळ रजेवर असलेले पोलीस अंमलदार यांचेशी संपर्क साधून त्यांना गणेशोत्सव व मराठा आरक्षणाचे अनुषंगाने जमा झालेल्या जनसमूदायाची माहिती देवून कायदा व सुव्यवस्थेचे अनुषंगाने बंदोबस्ताकामी संबंधित पोलीस अंमलदार यांची नितांत आवश्यकता असल्याचे कळवून त्यांना तात्काळ कर्तव्यावर हजर होणेबाबत सूचित करून त्यांना कर्तव्यावर उपस्थित करावे.
नक्की वाचा : 'राजकीय पोळी भाजू नका, नाहीतर तोंड भाजेल'; जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world