जाहिरात

विधानसभा लढवण्यावर ठाम होते, जरांगे पाटलांनी अचानक निर्णय का बदलला? निवडणुकीतून का घेतली माघार?

महाराष्ट्राच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट आला असून मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार घेतली आहे.

विधानसभा लढवण्यावर ठाम होते, जरांगे पाटलांनी अचानक निर्णय का बदलला? निवडणुकीतून का घेतली माघार?
मुंबई:

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) काढलेल्या मोर्चातून अख्खा देश ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा होती. राज्यातील मराठा समाजाला एकत्र करून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी एकजूट झालेले जरांगे पाटील काही तासांपर्यंत विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र अचानक पत्रकार परिषद घेत त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

काही दिवसांपूर्वी त्यांनी दलित आणि मुस्लीम समाजाला त्यांच्या उमेदवारांची यादी पाठवण्याचं आवाहन केलं होतं. जेणेकरून मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्रितपणे विधानसभेला सामोरं जातील. मात्र मित्रपक्षांकडून जरांगे पाटलांकडे कोणाचीही यादी आली नाही. त्यात आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आज सकाळीच जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माघारीची घोषणा केली. 

मनोज जरांगे पाटलांचा काही तासांत यू-टर्न; विधानसभा निवडणुकीतून माघार

नक्की वाचा - मनोज जरांगे पाटलांचा काही तासांत यू-टर्न; विधानसभा निवडणुकीतून माघार

मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीतून का घेतली माघार?
महाराष्ट्राच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट आला असून मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. आवाहन केल्यानंतरही मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी नाही असं जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पुढे ते म्हणाले, एका जातीवर या राज्यात कुणीच निवडणूक जिंकू शकत नाही. थोडा नाईलाज आहे, एकट्यानेच कसं लढायचं आणि जिंकून यायचं? तो जातीचा अपमान होईल. आतापर्यंत मित्रपक्षांची यादी आलेली नाही आणि लगेच डिक्लेअर करायचंय. आता जर त्यांच्याकडे बघत राहीलं तर एकमेकांचे फॉर्म माघारी कसे घ्यायचे, यावरच रात्री 3 वाजेपर्यंत चर्चा झाली. मतदारसंघ ठरले होते, फक्त उमेदवार द्यायचे राहिले होते. पहाटे पाच वाजेपर्यंत हातात लिस्ट घेऊन बसलो होतो. आपल्याला निवडणुकीचा अनुभव नाही. त्यामुळे एकाच जातीवर निवडणूक जिंकता येत नाही. सर्व संबंधित उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा.

मित्रपक्षांनी उमेदवार दिले नसल्यामुळे माघारीचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, ही माघार नाही तर गनिमी कावा समजा. कुणाला पाडा म्हणणार नाही, जिंकवा म्हणणार नाही. कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला पाठिंबा नाही असंही ते यावेळी म्हणाले.