
'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...', कवी सुरेश भट यांच्या या सुंदर ओळी आपल्या मराठी भाषेचा समृद्ध वारसा अन् वैभव मांडतात. मराठी भाषेला जितका मोठा समृद्ध वारसा आहे तितकीच मोठी आणि थोर साहित्य परंपरा आहे. आज (27, फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन.. मात्र काही जण याला मराठी राज्यभाषा दिन म्हणतात. काय आहे या दोन्हींमधील फरक, जाणून घ्या सविस्तर....
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठी भाषा गौरवदिन का साजरा केला जातो?
श्रेष्ठ मराठी साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी रोजी जन्मदिवस. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. मराठी भाषा गौरवदिनाचे निमित्त साधत राज्यभर विविध कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, कवी संमेलनांचे आयोजन केले जाते.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. मराठी कविता आणि साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम कवी कुसुमाग्रज यांनी केले. मराठी ही शिकण्याची भाषा व्हावी, मराठी बोलीभाषेला महत्वाचे स्थान मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणूनच मराठी साहित्यातील मानाचे पान म्हणून कवी कुसुमाग्रज यांचे नाव आदराने घेतले जाते.
( नक्की वाचा : CBSE Exam : दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार, वाचा काय आहे प्रस्ताव? )
वि.वा शिरवाडकर यांनी लिहलेली नटसम्राट, किनारा, वादळवेल, मराठी माती, विशाखा, ही नाटके आणि कादंबऱ्या प्रचंड गाजल्या. कुसुमाग्रजांनी 16 कविता, 3 कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, 18 नाटके आणि सहा एकांकिका लिहल्या. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला.
मराठी राजभाषा दिन म्हणजे काय?
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य बनले. त्याचबरोबर मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्य केले गेले. तेव्हापासून १ मे हा ‘मराठी राजभाषा दिन' किंवा ‘मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषादिनानिमित्तही राज्यभरात विविध कार्यक्रमांचे, शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. 1 मे यादिवशी मराठी भाषा दिनासोबतच महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनही साजरा केला जातो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world