सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या साध्या आणि हसऱ्या अभिनयाने लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी रील स्टार रोहिणी नीलेश पाराध्ये (Rohini Paradhye) हिने राहत्या गावी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. रोहिणीच्या या टोकाच्या पाऊलामुळे तिचे लाखो चाहते आणि सोशल मीडिया वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
हॉटेलच्या स्वयंपाकघरात घेतला गळफास
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ब्रह्मपुरी येथील त्यांच्या स्वतःच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने रोहिणीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. हा प्रकार लक्षात येताच तिचे पती नीलेश पाराध्ये यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला तातडीने खाली उतरवून मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी तिला तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
(नक्की वाचा- पुणे पोर्शे अपघात प्रकरणात; अग्रवाल कुटुंबाचा माज कायम! जेलमधून बाहेर आल्यानंतरचा संतापजनक VIDEO व्हायरल)
ग्रामीण जीवनशैली आणि खाद्यसंस्कृतीवरील रील्स होत्या लोकप्रिय
रोहिणी आणि नीलेश पाराध्ये हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होते. ग्रामीण जीवनशैली, विविध सामाजिक विषय आणि महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती यावर आधारित त्यांचे रील्स नेटीझन्सच्या पसंतीस उतरत होते. ब्रह्मपुरी येथील आपल्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात विविध गावरान खाद्यपदार्थ तयार करतानाचे त्यांचे व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर कमालीचे लोकप्रिय झाले होते.
(नक्की वाचा- Iran War: जगाचं टेन्शन वाढलं! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले! स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात ड्रोन स्टेशन उद्ध्वस्त)
व्यवसाय वाढवण्याचे होते स्वप्न
या व्यवसायात उत्तम प्रकारे स्थिर झाल्यानंतर, लवकरच आपल्या हॉटेलच्या आणखी नवीन शाखा (New Branches) सुरू करणार असल्याचे सूतोवाचही या दांपत्याने काही दिवसांपूर्वीच केले होते. असे असताना, ज्या हॉटेलच्या स्वयंपाकघराने रोहिणीला स्टार बनवले आणि ओळख मिळवून दिली, त्याच ठिकाणी तिने आपले जीवन संपवल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहिणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, मंगळवेढा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world