मारकडवाडीतील गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया राबविल्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याने आज होणारं मतदान रद्द करण्यात आलं. पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
मारकडवाडीतून राम सातपुते यांना 843 तर उत्तम जानकरांना 1003 मतं मिळाली. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. सातपुतेंना फक्त 100 ते 150 मते अपेक्षित होती. तर जानकरांना दीड हजार पेक्षा जास्त मतं अपेक्षित होती. हे सगळं ईव्हीएममध्ये घोळ करुन केल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आणि आज त्याची प्रक्रिया पार पडणार होती.
नक्की वाचा - विधानसभा निवडणुकीनंतर आज मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान; काय आहे कारण?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरज मतदारसंघातील मारकडवाडी गावातील भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेचा मास्टर माईंड हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आहेत. रणजितसिंह यांची लवकरच पक्षातून हकालपट्टी होईल आणि माळशिरस तालुक्यात लवकरच उत्तम जानकर यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द होऊन पोटनिवडणूक लागेल, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
नाना पटोलेंकडून मारकडवाडीच्या ग्रामस्थांचं कौतुक...
विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका आहे. आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी सोलापूरच्या मारकडवाडी ग्रामस्थांनी आज (मंगळवार, ३ डिसेंबर) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. पण प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करून, पोलिसी बळाचा वापर करून गावक-यांना मतदानापासून रोखले. मारकडवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे. त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नक्की वाचा - सत्ता स्थापनेच्यापूर्वी शिवसेना खासदार रिंगणात, एकनाथ शिंदेंकडं केली आग्रही मागणी
मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर प्रशासन एका छोट्या खेड्यात मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला का घाबरत आहे? आपले बिंग फुटेल म्हणून? EVM वरचे मतदान निर्दोष आहे, त्यात काही घोटाळा नाही हे जनतेला पटवून देण्याची संधी प्रशासनाने भाजपच्या दबावामुळे गमावली आहे. त्याचवेळी मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली. काँग्रेस पक्ष या लढाईत ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन लोकशाहीचा विजय होईल. डरो मत!
रणजितसिंह मोहिते पाटलांविरोधी वातावरण..
विधानसभा सदस्य आमदार आणि भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस मतदारसंघात पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे. माळशिरसचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनीही रणजितसिंह यांनी पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिम भागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी यापूर्वी म्हणजेच 26 नोव्हेंबरला अशीच मागणी केली होती.
माळशिरस मतदारसंघातून विधानसभेत कोण जिंकलं?
शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विधानसभेत १३,१४७ मतांनी विजयी झाले आहे. त्यांना १,२१,७१३ मतं तर राम सातपुते यांना १,०८,५६६ मतं मिळाली असून १३,१४७ मतांनी पराभव झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world