
निलेश बंगाले, प्रतिनिधी
Mazi Ladki bahin yojana e-kyc : महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या तांत्रिक अडचणींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करताना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. योजनेची अधिकृत वेबसाइट सतत बंद होत असल्यामुळे आणि ओटीपी येत नसल्यामुळे लाडक्या बहिणींना ई- केवायसी करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लाभार्थी महिला वेबसाइटवर आधार क्रमांक टाकतात. त्यावेळी यावर 'एरर' दाखवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे पुढील प्रक्रिया थांबते. याशिवाय ज्या काही महिलांना आधार क्रमांक टाकून पुढची प्रक्रिया करत त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येत नसल्याची मोठी समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया थांबून अर्ज अपूर्ण राहत आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे अनेक इच्छुक महिलांना अर्ज भरता येत नाहीयेत, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. वर्ध्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांना या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे.
तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोठा फटका बसत आहे. अनेकजणी सायबर कॅफेमध्ये जाऊन तासनतास वाट पाहत आहेत. तरीही त्यांचे काम होत नाही. सरकारने या समस्येकडे त्वरित लक्ष घालून वेबसाइटवरील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी लाभार्थी महिला आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. तांत्रिक अडथळे दूर न झाल्यास योजनेच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठीhttps://t.co/gBViSYZxcm या संकेतस्थळाला भेट द्यावी.
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 20, 2025
मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार… pic.twitter.com/aNynvJb2Rp
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ई-केवायसीची प्रक्रिया सविस्तर सांगितली आहे. त्यांनी फ्लोचार्ट शेअर केला असून कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करणं आवश्यक आहे, हेदेखील नमूद केलं आहे. मात्र मोठ्या संख्येने लाभार्थी वेबसाइटवर ई-केवायसी करीत असल्याने साइटवरील लोड वाढल्याचं सांगितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world