MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २०२५ मध्ये मुंबई मंडळाची सोडत न निघाल्याने निराशा पदरी पडलेल्या इच्छुकांसाठी म्हाडाने आता २०२६ च्या सोडतीची तयारी जोमाने सुरू केली आहे. या आगामी सोडतीत वांद्रे पूर्व येथील मोक्याच्या 'एमआयजी' (MIG) वसाहतीतील ४४ घरांचा समावेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, ही सर्व घरे मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) राखीव असणार आहेत.
म्हाडाकडून नववर्षाचे गिफ्ट...!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वांद्रे पूर्व भागातील खेरवाडी, गांधीनगर आणि एमआयजी वसाहतींमधील जुन्या इमारतींचा पुनर्विकास वेगाने सुरू आहे. येथील एमआयजी वसाहतीमधील 'ओबी १०' आणि '११' या इमारतींचा पुनर्विकास एका खासगी विकासकामार्फत केला जात आहे. या पुनर्विकासातून म्हाडाला आपल्या हिश्श्यातील ४४ घरांचा साठा उपलब्ध झाला आहे. ही घरे एका स्वतंत्र २२ मजली इमारतीत असून, त्यांचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
BMC Election 2026: मुंबई, ठाण्यात भाजप- शिवसेनेचे जागा वाटप ठरले! कोण किती जागा लढणार?
मार्च २०२६ पर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होईल आणि एप्रिलमध्ये ही घरे अधिकृतपणे मंडळाच्या ताब्यात येतील. बीकेसीसारख्या व्यावसायिक केंद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या घरांचे क्षेत्रफळ ६६ ते ८५ चौरस मीटरच्या दरम्यान आहे. प्रत्येक मजल्यावर दोन सदनिका अशी या इमारतीची रचना आहे. पहिल्या दोन मजल्यांवरील घरे प्रशस्त असून ती ८५ चौरस मीटरची आहेत, तर उर्वरित मजल्यांवरील घरे ७६ चौरस मीटरची आहेत.
वांद्रे पूर्वमध्ये मिळणार घरे
दरम्यान, वांद्रे पूर्व सारख्या अतिशय महागड्या भागात मध्यमवर्गीयांना घर मिळण्याची ही दुर्मिळ संधी असेल. मात्र, या भागातील जमिनीचे दर पाहता, ही घरे म्हाडाच्या इतर घरांच्या तुलनेत काहीशी महागडी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मार्च २०२६ मध्ये या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.
PMC Election 2026: पुण्यात अजित पवारांचा धमाका! भाजप-सेनेला धक्का; अखेरच्या क्षणी काय घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world