यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : उकाड्यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. पावसाच्या प्रतीक्षेसाठी लोक आकाशाला डोळे लावून बसले आहेत. मात्र अद्यापही पावसाची चिन्हं दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वी हवामान विभागाकडून येत्या १५ ते १६ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रभर व्यापेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र मान्सून मध्येच रेंगाळल्याचं चित्र आहे. त्यामुळे मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यात अतिरिक्त वेळ लागणार असल्याची माहिती आहे. जवळपास अर्धा जून महिना पूर्ण झाला तरीही महाराष्ट्रात मान्सूनची चिन्ह दिसत नसल्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये अल निनो सक्रिय झाला असून याचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागे एल निनोचा प्रभाव असल्याचं कारण सांगितलं जात आहे.
मान्सून महाराष्ट्र कधी व्यापणार?
मान्सूनचा प्रगती पाहिली तर आतापर्यंत मान्सून तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पोहोचला आहे. सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात येणारा पाऊस पूर्व मोसमी आहे. अद्याप मान्सून पुढे सरकत नसल्याचं चित्र आहे. पुढील ४ ते ५ दिवसातही मान्सून पुण्यात धडकण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पावसाचे संकेत कमी आहेत. यावर्षीही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जून ते सप्टेंबर या पावसाच्या कालावधीत अल निनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पुढील काही दिवस पावसाची शक्यता नसल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या वातावरणीय परिस्थिती अनुकूल नाही. पूर्वमोसमी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता असून राज्यात मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं पुणे वेधशाळेतून हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world