
CM on MPSC Exam : राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात. पण, आता अभियांत्रिकी शिक्षणही मराठी भाषेत घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची पुस्तके आता मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने अभियांत्रिकी परीक्षांचा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करून सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षाही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन शासनाने केले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
शक्तीपीठ महामार्गामुळे राज्याचा सर्वांगीण विकास
शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत 12 जिल्ह्यांमधून जाणार असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितले.
( नक्की वाचा : Jayant Patil : ' आमचा दारुण पराभव झालाय... माझं काही खरं नाही', जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ )
समृद्धी महामार्गामुळे 12 जिल्ह्यांचे जीवनमान बदलले, त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गामुळेही मोठे परिवर्तन घडेल. या महामार्गामुळे राज्यातील विविध भागांत सुलभ आणि वेगवान वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, ज्यामुळे व्यापार आणि उद्योगांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world