मुंबईच्या लोकल प्रवासात रोज लाखो प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या ‘UTS' या मोबाईल प्रणालीवरील क्यूआर कोड तिकीट आरक्षणाला ब्रेक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने या दोन्ही मार्गांवर पुढील सूचना मिळेपर्यंत ही सुविधा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर होणारा गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता मोबाईल तिकीट आरक्षण रेल्वे रुळ आणि स्टेशन परिसरापासून 20 मीटरच्या भौगोलिक सीमेबाहेरच करणे शक्य होणार आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यात यश मिळेल असा रेल्वे प्रशासनाला वाटते आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दलची माहिती त्यांनी आपापल्या सोशल मीडिया माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांकडून या प्रणालीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. रेल्वेला 2023 साली या गैरप्रकाराबद्दलची माहिती मिळाली होती. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना एक अशी वेबसाईट सापडली होती ज्यावर प्रत्येक उपनगरीय स्थानकाचे QR कोड उपलब्ध होते. प्रवाशी हे कोड डाउनलोड करून, प्रिंट काढून किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकत होते. यामुळे तिकीट तपासनीस (TTE) दिसताक्षणी तिकीट काढता येत होते. काही प्रवासी तर अनेक स्थानकांचे QR कोड घेऊन फिरत असतानाही रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना आढळून आले होते.
नक्की वाचा: 'लालबागच्या राजा'चे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला अपघात, एकाचा मृत्यू
ही समस्या विशेषतः वातानुकूलित (AC) लोकलमध्ये जास्त होती. एसी लोकलमध्ये कंपार्टमेंट नसतात. या लोकलचे डबे सलग असतात म्हणजेच एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी मार्ग असतो. अशावेळी लांबून टीसी दिसताच प्रवासी तिकीट काढत होते. QR कोडच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी 'UTSonmobile' ॲपची मूळ रचना GPS-आधारित जिओ-फेन्सिंगसह करण्यात आली होती. यामध्ये तिकीट तेव्हाच काढता येत होते, जेव्हा प्रवासी स्टेशनच्या परिसरापासून कमीत कमी 20 मीटर दूर आणि त्याच्या बोर्डिंग पॉइंटपासून 2 किमीच्या आत असेल. सुरक्षेसाठी, ॲपने फोन गॅलरीमध्ये सेव्ह केलेले QR कोड स्कॅन करण्यासही परवानगी दिली नव्हती. मात्र, प्रवाशांनी दुसऱ्या प्रवाशाच्या फोन स्क्रीनवरील कोड स्कॅन करून या नियमाला बगल देत तिकीट बुक करणे सुरू केले होते.
नक्की वाचा: 'समृद्धी'वर एकही शौचालय दिसले नाही, कोर्टाने MSRTCचा खोटारडेपणा उघड केला
रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, यावर दीर्घकाळ टिकणारा एकमेव उपाय म्हणजे ‘डायनॅमिक' (Dynamic) QR कोड सुरू करणे, जे दर काही मिनिटांनी बदलतील. स्टॅटीक QR कोडपेक्षा डायनॅमिक QR कोड हा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी फायदेशीर ठरेल असे तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे.