जाहिरात

Karnak Flyover: मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार! कर्नाक उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण

स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी दिनांक 13 जून 2025 रोजी भार चाचणी (Load Test) घेण्यात येणार आहे. त्‍याचे परिणाम 48 तासानंतर म्‍हणजेच दिनांक 15 जून 2025 रोजी प्राप्‍त होणे अपेक्षित आहे.

Karnak Flyover: मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार!  कर्नाक उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण

मुंबई: मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत म्‍हणजेच दिनांक 10 जून 2025 रोजी पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी (Lane Marking), पथदिवे (Street light), रंगरंगोटी (Painting), दिशादर्शक फलक (Signboard) उभारणी कामे प्रगतिपथावर असून ती येत्या चार दिवसात पूर्ण होत आहेत. सद्यस्थितीत कर्नाक रेल्‍वे पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्‍याकामी सज्‍ज आहे.  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज (दिनांक 10 जून 2025) कर्नाक पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची पाहणी केली. प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्‍तम श्रोते, उपप्रमुख अभियंता श्री. राजेश मुळे यांच्‍यासह संबंधित अभियंते यावेळी उपस्थित होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. 125 वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्‍याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने ऑगस्‍ट 2022 मध्‍ये पुलाचे निष्‍कासन केले. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग (Connectivity) कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. मध्‍य रेल्‍वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्‍यात आले आहे.सद्यस्थितीत आर.सी.सी. डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या ह‌द्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.

 या प्रकल्प अंतर्गत 550 मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई दिनांक 19 ऑक्‍टोबर 2024 रोजी आणि उत्‍तर बाजूची लोखंडी तुळई दिनांक 26 आणि 30 जानेवारी 2025 रोजी रेल्‍वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही यशस्‍वीरित्‍या पूर्ण करण्‍यात आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने वाहतूक व वीज पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये घेतलेल्या विशेष खंड (स्पेशल ब्लॉक) दरम्यान तुळई सुरक्षितरित्या व यशस्वीपणे सरकवण्यात आली आहे. 550 मेट्रिक टन वजनाच्या लोखंडी तुळईची जुळवणी जमिनीपासून 8 ते 9 मीटर उंचीवर पूर्ण करून, रेल्वे भागावर 58 मीटर अधांतरी सरकविणे, सुमारे 2 मीटर उंचीवरुन खाली उतरविणे, आर.सी.सी. आधारस्तंभावर स्थानापन्न करणे अशाप्रकारचे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या हे काम अत्यंत आव्हानात्मक, जोखमीचे काम होते. त्यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. 

नक्की वाचा : 'टाईम प्लीज' घेतलेला पाऊस पु्न्हा परतणार; येत्या 2-3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज

तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाल्‍यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्‍म नियोजन करून टप्‍पानिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती महानगरपालिकेच्‍या पूल विभागामार्फत करण्‍यात आली. दिनांक 2 फेब्रुवारी 2025 पासून पूर्वेकडील संपूर्ण कामे म्‍हणजेच पायाभरणीपासून ते डांबरीकरणापर्यंतची कार्यवाही अवघ्या 4 महिन्यात पूर्ण करण्यात आली आहे. ही कामे कमी वेळेत पूर्ण करणे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक, कौशल्याचे व जोखमीचे होते. या प्रकल्पाचे पर्यवेक्षण सल्लागार मेसर्स राईट्स लिमिटेड यांनी पुलासाठी संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र (structural stability certificate) दिले आहे. 

 पूर्व आणि पश्चिमेकडील आरसीसी डेक स्लॅबचे काम देखील पूर्ण झाले आहे. मार्गिकेवरील काँक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक (Noise Barriers) आदी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वे हद्दीत अपघातरोधक अडथळा (Anti Crash Barriers) बसवण्यात आले आहेत. एकूणच पुलाचे मुख्‍य बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे जसे की, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, पथदिवे, थर्मोप्लास्ट, कॅट आईज आदी कामे दिनांक 14 जून 2025 पर्यंत पूर्ण केली जातील. पुलाची भारक्षमता, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी दिनांक 13 जून 2025 रोजी भार चाचणी (Load Test) घेण्यात येणार आहे. त्‍याचे परिणाम 48 तासानंतर म्‍हणजेच दिनांक 15 जून 2025 रोजी प्राप्‍त होणे अपेक्षित आहे. 

नक्की वाचा : गुगल मॅपमुळे कार हवेत लटकली; प्रवासी थोडक्यात बचावले

 या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर म्‍हणाले की, वाहतूक पोलिस विभागाच्‍या विशेष परवानगीने, महानगरपालिकेच्‍या पूल विभागामार्फत मागील दोन महिने दररोज 24 तास पुलाचे काम सुरू होते. त्‍यामुळे विक्रमी वेळेत पुलाचे मुख्‍य बांधकाम पूर्ण करणे झाले आहे. भार चाचणी प्रमाणपत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI) च्‍या तज्‍ज्ञांशी सल्‍लामसलत करून आणि वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून पूल वाहतुकीस खुला करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे श्री. बांगर यांनी नमूद केले.

कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे -

- मुंबई शहराच्या दक्षिणेतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा 
- पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुरक्षित व वाढीव सुविधा उपलब्ध होणार 
- पूर्व मुक्तमार्गावरून येणारी वाहतूक, तसेच पी. डि'मेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत 
- पी. डि'मेलो मार्गावरून गिरगाव, चर्चगेट, मंत्रालय, काळबादेवी, धोबी तलाव  परिसरात  वाहतूक सुविधा  
- युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार

Listen to the latest songs, only on JioSaavn.com