Shivsena Leader Neela Desai Passed Away: महाराष्ट्रातील 29 महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी आता शांत झाली असून शुक्रवारी निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसला. गेली 25 वर्ष ठाकरेंची निर्विवाद सत्ता असलेली मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातातून निसटली. या निकालानंतर ठाकरेंना दुसरा जबर धक्का बसला असून शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचं दुःखद निधन झाले आहे.
शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदाराचे निधन
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे दुःखद निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नीला देसाई यांची प्राणज्योत मालवली. एकीकडे निकाल समोर येत असतानाच नीला देसाई यांची प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचाराआधीच त्यांचे दुःखद निधन झाले. आज दुपारी बारा वाजता ओशिवरा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. या घटनेने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
नीला देसाई या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होत्या. बाळासाहेब ठाकरेंच्या निष्ठावंत, शिवसेनेच्या आक्रमक महिला कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. नीला देसाई यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून येत शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळवला होता. एकीकडे निवडणुकीतील निसटत्या पराभवाने ठाकरेंना धक्का बसला असतानाच नीला देसाई यांच्या निधनाची बातमी आल्याने शिवसेना ठाकरे गटाला दुहेरी धक्का बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world