जाहिरात

जरांगेच्या आंदोलनासाठी किती माणसे आली? पहिल्यांदाच झाला खुलासा; मुंबईत आलेल्या गाड्यांची संख्याही कळाली

Maratha Reservation Protest: आंदोलकांनी आणलेल्या गाड्या कुठेही आणि कशाही पार्क केल्याने दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाली होती.

जरांगेच्या आंदोलनासाठी किती माणसे आली? पहिल्यांदाच झाला खुलासा; मुंबईत आलेल्या गाड्यांची संख्याही कळाली
मुंबई:

मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत पोहोचले आहेत. दक्षिण मुंबईतील विविध भागांमध्ये हे आंदोलक शिरले असून त्यामुळे दक्षिण मुंबईत मोठा गोंधळ उडाला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दक्षिण मुंबईतून आंदोलकांना बाहेर काढा असे निर्देश दिले होते. सीएसएमटी स्टेशन, फोर्ट परिसरासह दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये मराठा आंदोलक शिरले होते. याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. या सगळ्यामुळे मुंबईत नेमके किती मराठा आंदोलक आले होते असा प्रश्न विचारला जात होता. 

फक्त 5 वाहने आणि 5 हजार आंदोलकांना होती परवानगी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईल आलेल्या आंदोलकांची संख्या ही परवानगीपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे दिसून आले आहे. सुमारे 40,000 आंदोलक आणि 5,000 वाहने मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलन आयोजकांना पाठवलेल्या एका नोटिसीतून ही माहिती पहिल्यांदाच उघड झाली असून, यामुळे आंदोलनाच्या आयोजनातील बेशिस्तपणा आणि नियमभंग समोर आला आहे. केवळ 5000 आंदोलकांना आणि 5 वाहनांना परवानगी असताना, एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक आणि वाहने दक्षिण मुंबईत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. 

नक्की वाचा: रस्त्यावर शौचाला बसण्यापासून आत्महत्येच्या धमकीपर्यंत,आंदोलकांकडून 11 अटींचे उल्लंघन

नियमांचे स्पष्टपणे उल्लंघन

आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आडार यांनी आंदोलन आयोजकांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमधून अनेक बाबींचा खुलासा झाला आहे. आंदोलकांनी कोणत्या अटी शर्तींचे कसे उल्लंघन केले हे या नोटीसमध्ये सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. या नोटीसमध्ये नमूद केलेल्या 11 उल्लंघनांपैकी सर्वाधिक गंभीर उल्लंघन हे आंदोलकांनी जमा केलेल्या संख्येचे आणि वाहनांचे आहे.

इतरांना परवानगी असून आंदोलन करता आले नाही

नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केल्यानुसार, आंदोलनात जास्तीत जास्त 5000 आंदोलक सहभागी होणे अपेक्षित होते. ही मर्यादा ठरवण्यामागे मुंबईतील जागेची उपलब्धता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे हे मुख्य कारण होते. मात्र, पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, या आंदोलनात तब्बल 40,000 आंदोलक सहभागी झाले होते. ही संख्या ठरवून दिलेल्या संख्येच्या आठपट जास्त आहे. याचमुळे आझाद मैदान पूर्णपणे भरून गेले आणि 29 ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी परवानगी घेतलेल्या इतर संघटनांना जागाच मिळाली नाही. या संघटनांना मैदानाबाहेर थांबावे लागले, ज्यामुळे त्यांचा आंदोलनाचा हक्क हिरावला गेला.

नक्की वाचा: मनोज जरांगेकडून नियमांचे उल्लंघन, पवार- ठाकरेंकडून मदत..', सदावर्तेंचा हायकोर्टात दावा

पोलिसांनी केवळ पाच वाहनांना आझाद मैदान परिसरात येण्याची परवानगी दिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या आंदोलकांनी सुमारे 5,000 वाहने आणली. या सर्व वाहनांनी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आणि चौकांमध्ये अनधिकृत पार्किंग करून वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. महात्मा गांधी मार्ग, दादाभाई नवरोजी मार्ग, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मंत्रालय यांसारख्या अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. यामुळे कामावर जाणाऱ्या सामान्य मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही पुढे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com